कानडी आणि मराठी भाषेचा संघर्ष नाही. भाषा या  बहिणी असल्यामुळे त्या कधीही एकमेकींचा द्वेष करीत नाहीत. माणूसच हा चमत्कार करत असतो. महाराष्ट्राची राजकीय इच्छाशक्ती नसली तरी प्रत्येक मराठी माणसाने सीमावर्ती बांधवाच्या बाजूने उभे राहिल्यास बेळगाव प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही , असे मत ८७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी येथे व्यक्त केले.
ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने मंगळवारी फ. मुं. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सध्याच्या व्यवस्थेबद्दल आपली मते मांडली.
साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडीला आपण निवडणूक, प्रतिस्पर्धी असे शब्द वापरले नाहीत. कारण ही सन्मानाची प्रक्रिया आहे. निवडणुकीला उभे असलेले चारही उमेदवार मराठीचे प्रतिनिधी होते. एकाच्या वाटय़ाला हा सन्मान आला, तो चौघांचाही सन्मान आहे. निवडीनंतर लोकप्रियता जिंकली, अंतर्मुखता हरली अशी प्रतिक्रिया आली. मात्र गेल्या ४० वर्षांपासून अंतर्मुख करणार जे लिहीत गेलो त्याला लोकप्रियता मिळाली याचा आनंद आहे.  या संमेलनाविषयी अजून वाद निर्माण झाला नाही. मातृभाषेचा हा वार्षिक महोत्सव आहे आणि संमेलनापेक्षा भाषेच्या अर्थाने दुसरे तीर्थक्षेत्र नाही, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.