लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांचे निधन

शिरीष पै यांनी हायकू हा काव्य प्रकार मराठीत आणला आणि रुजवला

शिरीष पै यांचे संग्रहित छायाचित्र
कथा, कविता, ललित लेखन, बाल साहित्य, नाटक या सगळ्या साहित्य प्रकारांमध्ये मुक्त संचार करणाऱ्या शिरीष पै यांचे शनिवारी मुंबईत राहत्या घरीच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. शिरीष पै या सुप्रसिद्ध लेखक आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या. आज संध्याकाळी ७.३० वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत शिरीष पै यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

शिरीष पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. त्यांना लहानपणापासून वडिल आचार्य अत्रे यांच्याकडूनच लेखनाचे बाळकडू  मिळाले. आचार्य अत्रे हे आक्रमक विचारांचे साहित्यिक म्हणून प्रसिद्ध होते. शिरीष पै यांनी आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ या वृत्तपत्रातून पत्रकार म्हणूनही काम केले. साहित्य विचारांचे आणि वाचनाचे संस्कार त्यांच्यावर घरातील वातावरणामुळे आपोआपच होत गेले. ‘हायकू’ हा काव्यप्रकार त्यांनी मराठीत रूजवला आणि वाढवला. शिरीष पै यांनी समाजसेवा हेदेखील आपले व्रत मानले होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मराठी या भाषेत लिहित होत्या.

शिरीष पै यांच्या लेखनाची एक स्वतंत्र शैली आहे. त्यांच्या स्वतंत्र लेखन शैलीमुळे वाचकांना कायमच आनंद मिळाला आहे. शिरीष पै यांचे ‘एक तारी’, ‘एका पावसाळ्यात’, ‘गायवाट’, ‘कस्तुरी’, ‘ऋतुचक्र’ हे आणि असे अनेक कवितासंग्रह वाचकांनी डोक्यावर घेतले आहेत. ‘लाल बैरागीण’, ‘हे ही दिवस जातील’ या कादंबऱ्यांचे लेखनही शिरीष पै यांनी केले आहे. ‘आईची गाणी’, ‘बागेतील जमती’ या बालसाहित्यांची निर्मिती त्यांनी केली. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात मुक्त वावर करणाऱ्या एका हरहुन्नरी लेखिकेने अखेरचा श्वास घेतल्याने साहित्य विश्वात हळहळ व्यक्त होते आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi poet playwriter journalist ms shirish pai passes away in mumbai