मराठीमध्ये रॉक आणि पॉप गाणी लोकप्रिय करून या संगीताचा पाया घालणारे गायक व संगीतकार नंदू (सदानंद) भेंडे यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे हे त्यांचे वडील आहेत.
मराठी सुगम आणि नाटय़ संगीत लोकप्रिय असतानाच्या काळात म्हणजे सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी भेंडे यांनी मराठीमध्ये हा पाश्चात्य संगीत प्रकार आणला आणि रुजवला. ‘जिझस क्राइस्ट सुपरफास्ट’, ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकातही त्यांनी काम केले होते. मराठीत रॉक-पॉप गाणी लोकप्रिय करण्याबरोबरच भेंडे यांनी ‘व्हेलवेट फॉग’, ‘सेव्हेज एनकाऊंटर’, ‘ऑटोमिक फॉरेस्ट’ आदी बॅण्डमध्येही गाणी गायली होती. ‘डिस्को डान्सर’ या हिंदी चित्रपटासाठीही त्यांनी पाश्र्वगायन केले होते. दूरचित्रवाहिन्यांवरील ‘चमत्कार’, चंद्रकांता’, ‘जीना इसी का नाम है’, दायरे’ आदी हिंदी मालिकाना त्यांनी संगीत दिले होते. हिंदी चित्रपट सृष्टीतील आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, भप्पी लाहिरी या संगीतकारांकडेही भेंडे यांनी काम केले होते.भेंडे यांच्या पार्थिवावर सायंकाळी दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

विद्यापीठाच्या वेळापत्रकात आणखी बदल
मुंबई :  निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे विद्यापीठाच्या परीक्षांचे नियोजन पुरते बिघडले आहे. आता पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येत असलेल्या बीए तृतीय वर्ष आणि एमए पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार एम.ए.च्या राज्यशास्त्र विभागाचा पहिल्या सत्राच्या इंटरनॅशनल लॉ या विषयाची २२ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत होणारी परीक्षा दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात येणार आहे. तर एम.ए. सत्र दोनच्या इंग्रजी लिटररी थेअरी अ‍ॅण्ड क्रिटिझम या विषयाची २८ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत होणारी परीक्षा त्याच दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात येणार आहे.  इकॉनॉमिक्स : इंटरनॅशनल ट्रेड अ‍ॅण्ड कमíशअल पॉलिसी या विषयाची ३० एप्रिल रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत होणारी परीक्षा आता ३ ते ५ या वेळेत घेण्यात येणार आहे. तर बीएच्या तृतीय वर्षांची २२ एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता थेट १८ जून रोजी होणार आहे. तर ७ मे रोजी होणारी परीक्षा १७ मे रोजी होणार आहे.