मुंबई : राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठीच्या विजयी मेळाव्याची हाक देण्यात आली. या हाकेला मुंबईसह राज्यभरातील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून वरळीतील एनएससीआय डोम येथे राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक बहुसंख्येने दाखल झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील केसनंद गावातून मोहन यादव हे मोटारसायकलवरून काल सायंकाळी चार वाजता निघाले होते. त्यानंतर मुसळधार पावसातून मार्गक्रमण करीत त्यांनी आज सकाळी चार वाजता वरळी गाठली आहे.
मोहन यादव यांनी संपूर्ण मोटारसायकल ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी संबंधित विविध गोष्टींनी सजवलेली आहे. या मोटारसायकलवर मोहन यादव यांनी मशाल चिन्हाची प्रतिकृती, भगवे झेंडे, झेंडूच्या फुलांचे तोरण आणि बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतची छायाचित्रे लावली असून त्यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या आठवणींचा उल्लेखही केला आहे. तसेच शिवसेनेच्या समर्थनार्थ विविध घोषणा असलेले फलक, विविध वस्तूंनी आणि छायाचित्रांनी ही मोटारसायकल सजवलेली असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मोहन यादव यांनी ही मोटारसायकल २९ वर्षांपूर्वी सजवलेली असून ते मोटारसायकलद्वारे शिवसेनेचा प्रचार करीत असतात.
‘मुसळधार पाऊस असल्यामुळे मोटारसायकलवरून वरळीतील मराठीच्या विजयी मेळाव्याला न जाण्याचा सल्ला गावातील लोकांनी दिला होता. पण हा दिवस माझ्यासाठी दिवाळी आणि दसरा सणासारखा आहे. राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र यावेत, ही मनापासून इच्छा आहे. तसेच शिवसेना व मनसे एकत्र येऊन पुन्हा मूळ शिवसेना व्हावी, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने राज ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. भाजपकडून मराठीची गळचेपी केली जाते. तसेच ठाकरे ब्रँड संपविण्याचाही प्रयत्न केला जात आहे’, असे मत मोहन यादव यांनी व्यक्त केले.