मुंबई – मराठा कुणबी आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटिआरनुसार कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यास सुरूवात झाल्यानंतर सप्टेंबरपारपासून पाच महिन्यांत मराठवाड्यात ३५ हजार १६० कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक २३ हजार ८०२ कुणबी जात प्रमाणपत्रांचे तर लातूरमध्ये केवळ २४१ कुणबी जात प्रमाणपत्र या गॅझेटिअरनुसार देण्यात आली आहेत. हे सप्टेंबर २०२५ नंतर प्राप्त अर्ज व वितरित दाखल्यांचे प्रमाण कमी असून ते वाढविण्यात यावेत असे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्देश दिले आहेत.
मागील वर्षी २०२५मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मुंबईत मराठी समाजाच मोर्चा निघाला होता. या मोर्चाचे नेतृत्व मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी करून त्यांनी उपोषण केले होते. यावेळी मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. जलसंपदा मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीने ही अट मान्य केली. मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटिअरच्या संदर्भात सप्टेंबर २०२५ मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानंतर मराठवाडा महसूल विभागातील आठही जिल्ह्यांत प्रमाणपत्रांसाठी अर्ज प्राप्त होत असून, हे अर्ज प्रलंबित राहू नयेत यासाठी कार्यवाहीस गती देण्यात यावी, असे निर्देश राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
या उद्देशाने गावपातळी पर्यंत जाऊन शासकीय यंत्रणेने सक्रियपणे प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच माजी न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करून जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र वितरणातील अडथळे दूर करावेत. मराठा कुणबी जात दाखले व वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने स्पष्ट आदेश दिले असून, हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी, जिल्हा प्रशासनामार्फत सुरू असलेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा विभागीय आयुक्तांनी घ्यावा,असेही त्यांनी सांगितले.
वाटप झालेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची आकडेवारी
छत्रपती संभाजीनगर – १९५५
जालना – १९३९
परभणी १८२६
हिंगोली – २३८८
नांदेड – २९४
बीड – २३८०२
लातूर – २४१
धाराशीव २७१५

