यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना लाभ

मुंबई : मराठवाड्यातील लोकांची पाण्याची मागणी विचारात घेऊन ४४.५४ दशलक्ष घनमीटर (टीएमसी) अतिरिक्त पाणी वापरण्यास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील काही भागांस अधिकचे पाणी उपलब्ध होईल अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिली.

पाटील यांनी अलीकडेच मराठवाड्यातील विविध भागांत दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी पाण्याबाबत कै फियत मांडली होती. लोकांच्या मागणीची दखल घेत पाटील यांनी जलविज्ञान कार्यालयाच्या मुख्य अभियंत्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते. गोदावरी पाणीतंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे. या पूर्वी विविध बैठकांमध्ये पैनगंगा नदीत ११७.८७ टीएमसी पाणी आहे, असे गृहीत धरून आंध्र प्रदेश सरकारसोबत चर्चा केली जात होती. मात्र जलविज्ञान विभागाच्या अहवालानुसार निम्न पैनगंगा धरणापर्यंत ११७.८७ ऐवजी १६७.४६ टीएमसी पाणी उपलब्ध असल्याचे समोर आले. त्यामुळे या पाण्याचा वापर पैनगंगा उपखोऱ्यातील ऊध्र्व पैनगंगा प्रकल्पातील प्रत्यक्ष तूट भरून काढण्यासाठी व उर्वरित पाणी ऊध्र्व पैनगंगा प्रकल्पाच्या निम्न भागात वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचा फायदा हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांना होणार आहे. मंजूर अतिरिक्त पाण्याचा वापर आणि नियोजन पूस, अरुणावती व ऊध्र्व पैनगंगा प्रकल्पांच्या खालील भागात करण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार ऊध्र्व पैनगंगा ते निम्न पैनगंगामधील क्षेत्रामध्ये सुमारे ४४.५४ टीएमसी पाणी पुढील नियोजनासाठी उपलब्ध होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.