मुंबई : राज्यात यंदाच्या पावसाळ्यात जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे. केवळ जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे परिस्थिती काही प्रमाणात सावरली आहे. छत्रपती संभाजीनगर क्षेत्रातील धरणसाठा समाधानकारक नसल्याने मराठवाड्यात सप्टेंबरनंतर पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्यातील २५४ गावांना आजही २६० टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावरुन भविष्यातील पाणीटंचाईचे गांभीर्य दिसून येते.

कोकणात जून महिन्यात ६६२ मिलिमीटर पडणारा पाऊस यंदा केवळ ३७४ मिलिमीटर पडला. जुलै महिन्यात हाच पाऊस १४१ टक्के पडला. सरासरी पेक्षा ४१ टक्के जास्त पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत पाऊसाची टक्केवारी ५५ टक्के आहे. नाशिक विभागात जून मध्ये १३९ मिलिमीटर अपेक्षित पडणारा पाऊस केवळ ६० मिलिमीटर झाला. जुलै महिन्यात सर्वाधिक कमी पाऊस पडणाऱ्या नाशिक मध्ये ३७७ मिलिमीटर पडलेला आहे. ऑगस्ट पहिल्या वीस दिवसात पाऊसाची ही सरासरी घसरली असून ती केवळ ३८ टक्के आहे. पुणे विभागात जून महिन्यात १९८ मिलिमीटरच्या तुलनेत ८६ मिलिमीटर पाऊस झाला. ऑगस्ट मध्ये ही सरासरी २४७ ऐवजी केवळ ९९ मिलिमीटर आहे. मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर क्षेत्रात जून मध्ये अपेक्षित १३४ मिलिमीटरच्या तुलनेत ११३ मिलिमीटर, हा चांगला पाऊस झाला. जुलै महिन्यात या दृष्काळजन्य विभागात ११४ टक्के असा दमदार पाऊस झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या तीन आठवडयात मात्र फक्त २० टक्के पाऊस झाला आहे. अमरावतीत १४७ मिलिमीटरच्या तुलनेत १२५ मिलिमीटर आणि नागपूर विभागात १८७ मिलिमीटरच्या तुलनेत ९४ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. जून व ऑगस्ट महिन्यातील या पावसाने नागपूर मधील सर्व धरणात ५९ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. अमरावती मध्ये ६१ टक्के तर छत्रपती संभाजीनगर मध्ये केवळ ४९ टक्के पाणीसाठा आहे. नाशिक, पुणे, आणि कोकणातील धरणात सरासरी ७७ टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. पावसाच्या असमान वितरणाचा थेट परिणाम धरणसाठ्यावर झाला आहे. कोकण, नाशिक, पुणे, अमरावती आणि नागपूर विभागातील धरणांची स्थिती तुलनेने समाधानकारक आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थिती गंभीर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील मोठ्या-मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ सुमारे २४.७४ टक्के पाणीसाठा आहे. लघु-मध्यम प्रकल्पांचाही साठा कमी आहे. काही ठिकाणी तो २० टक्क्यांपेक्षाही खाली आहे.

राज्यातील २५४ गावांना २६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर टँकरची गरज भासत आहे. नाशिक विभागातील पाणीटंचाईची स्थिती पाहता, पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जून आणि ऑगस्टमधील पावसाची तूट भरून काढण्यासाठी ऑगस्टच्या शिल्लक दिवसात व सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाची आवश्यकता आहे. उपलब्ध धरणसाठ्यावर वाढता पिण्याच्या पाण्याचा भार, शेतीसाठीची गरज आणि टँकरची वाढती मागणी यामुळे राज्यासमोर गंभीर जलसंकट उभे राहू शकते. मराठवाड्यात पुढील काही महिन्यांत पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.