मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबई महानगरपालिका शिक्षण शिक्षकेतर सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून महानगरपालिका शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात करी रोड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयावर शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील खाजगी अनुदानित शाळेतील रिक्त जागांवर शिक्षक, लिपिक आणि शिपाई वर्गाची नेमणूक करणे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी डी. सी – १ योजना सुरू करणे आणि त्यांच्यासाठी विमा योजना लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ग्रांट इन कोड नियम लागू करणे, खाजगी अनुदानित शाळांना अनुदान देणे, खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांना टीएसए – २७ टक्के देय देणे, खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांना तात्काळ परवानगी देणे, २०१५ पासून कार्यरत टी. ई. टी शिक्षकांना कर्मचारी संकेतांक देणे, शिक्षक कर्मचाऱ्यांचे दावे प्रलंबित असल्यास त्यांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम तात्काळ देणे आदी विविध मागण्यांसाठी मुंबई महानगरपालिका शिक्षण शक्षकेतर सेनेने महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका शिक्षण शिक्षकेतर सेनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.