लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : कोलकाता येथील घटनेपाठोपाठ शनिवारी मध्यरात्री शीव रुग्णालयात महिला निवासी डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनानिमित्त सर्व निवासी डॉक्टरांनी एकमेकांना राख्या बांधून एकमेकांचे संरक्षण करण्याचे निर्धार केला. त्यानुसार जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सकाळी १० वाजता रुग्णालयातील अधिकारी, सुरक्षा रक्षक, पोलिस यांना राख्या बांधून राखीपौर्णिमा सण साजरा केली.
केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायदा तयार करण्याच्या मागणीसाठी सलग सात दिवस आंदोलन करत असलेल्या निवासी डॉक्टरांच्या मागणीला राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी केंद्र सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येत आहे. आज राखीपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व निवासी डॉक्टरांनी केंद्र सरकार दखल घेत नाही, तोपर्यंत एकमेकांचे संरक्षण करण्यासाठी स्वत:च पुढाकार घेतला आहे.
आणखी वाचा-विकासकाची तयारी असल्यास झोपु योजनेत ३०० चौ. फुटांपेक्षा मोठे घर!
आमच्या सुरक्षेसाठी आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करू, आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये गुंजल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास यावेळ मार्डच्या डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आला.
आता लढा दिल्लीत
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात होत असलेल्या आंदोलनाची दखल केंद्र सरकारकडून घेण्यात येत नसल्याने आता हा लढा देशाच्या राजधानीत नेण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना राखीसह पोस्टकार्ड पाठवण्यात येणार आहे. या पोस्टकार्डद्वारे त्यांना त्यांच्या तरुण भाऊ आणि बहिणींबद्दलच्या त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्यात येणार आहे, असे मार्डचे समन्वयक संपत सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच केंद्रीय मार्डचे एक शिष्टमंडळ उद्या दिल्लीला जाऊन केंद्रीय आरोग्य सचिवांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-हेलिकॉप्टर रुग्णवाहिका लवकरच रुग्णसेवेत
आंदोलनाला सर्वसामान्यांचा पाठिंबा
‘मार्ड’च्या आंदोलनाला आता सर्वसामान्य नागरिकांकडूनही पाठिंबा दिला जात आहे. डॉक्टरांचे नातेवाईक, मित्रमंडळी यांनी सोमवारी सकाळी ९ वाजता आझाद मैदानात एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला. आझाद मैदानात मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहिले आहेत.
शीव रुग्णालयात १२ वाजता आंदोलन
निवासी डॉक्टरावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी १२ वाजता शीव रुग्णालयात सर्व निवासी डॉक्टर, अध्यापक, आंतरवासिता विद्यार्थी, कर्मचारी एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत.