मुंबई : मुंबईला जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी १२ हेक्टर जागेवर मरिना प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकाम, संचालन आणि देखभालीसाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने मागविलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यासाठी एकूण पाच कंपन्यांनी निविदा सादर केल्या असून यात अदानी समूहाच्या सेमइंडिया प्रोजेक्टस लिमिटेडचा समावेश आहे. या निविदांची छाननी करून त्यांनतर आर्थिक निविदा खुल्या करण्यात येतील, त्यानंतर निविदेत कोण बाजी मारेल हे स्पष्ट होईल.
मुंबई बंदर प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रिन्सेस डाॅक येथे १२ हेक्टर जागेवर मरिना विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी ८८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक-खासगी सहभागातून हा प्रकल्प राबवविण्यात येणार आहे. या मरिना प्रकल्पात ३० मीटर लांबीपर्यंतच्या ४२४ लहान, मोठ्या नौका (याॅटस) उभ्या करता येणार आहेत. या प्रकल्पात मुख्य मरिना टर्मिनल इमारत बांधण्यात येणार असून नमो भारत इंटरनॅशनल सेलिंग स्कूल, सागरी पर्यटन विकास केंद्र, हाॅटेल्स, क्लबहाऊस आणि नौका दुरुस्ती सुविधा असणार आहेत. तर बँक, एटीएम केंद्र, वाहनतळ, टॅक्सी वाहनतळ, सभागृह, हाॅल, सुपर मार्केट आदी सुविधाही येथे विकसित केल्या जाणार आहेत. तर बोटी उभ्या करण्यासाठी किनारपट्टीपासून ५२३ मीटर आत समुद्रात जागा असणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकाम, संचालन, देखभालीसाठी मुंबई बंदर प्राधिकरणाकडून काही दिवसांपूर्वी निविदा मागविण्यात आल्या होत्या. नुकत्याच तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून या निविदा प्रक्रियेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेमइंडिया प्रोजेक्टस लिमिटेड, एल. ॲण्ड टी., आरकेईसी प्रोजेक्टस, एसीसी इन्फ्रास्ट्रक्चर आणि विश्वसमुद्र इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या पाच कंपन्यांच्या निविदा सादर झाल्या आहेत. सेमइंडिया प्रोजेक्टस लिमिटेड ही अदानी समूहाची कंपनी आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प, मोतीलाल नगर पुनर्विकास,वांद्रे रेक्लमेशन पुनर्विकासासह मुंबईतील अन्य काही प्रकल्प अदानी समूहाकडे आहेत. आता मरिना प्रकल्पासाठीही अदानी समूह उत्सूक असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आता मुंबई बंदर प्राधिकरण तांत्रिक निविदांची छाननी करणार आहे. त्यानंतर आर्थिक निविदा खुल्या करण्यात येतील. आर्थिक निविदेत बाजी मारणारी कंपनी हा प्रकल्प मार्गी लावले. त्यामुळे आता निविदेत कोण बाजी मारते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

