मुंबई: दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या मरीन ड्राइव्ह परिसरात बुधवारी एका तरुणाने भररस्त्यात धुमाकूळ घालत वाहतूक रोखून धरली. यावेळी कारवाईसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी झटापट करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारीत झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक रस्त्यावर सुव्यवस्था बिघडवणाऱ्या आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या या तरुणाला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळावरूनच तत्काळ ताब्यात घेतले.

दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरील ”आर्ट डेको” इमारतींसमोर हा प्रकार घडला. एका तरुणाने अचानक मुख्य रस्त्याच्या मध्यभागी येऊन वाहने थांबवून वाहतुकीला अडथला निर्माण खेला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेले मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी तेथे पोहोचले.

पोलिसांनी तरुणाला रस्त्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानेपोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेले. तरुण मानसिक तणावाखाली होता की मद्याच्या नशेत होता, याची तपासणी वैद्यकीय चाचणीद्वारे करण्यात येत आहे.