मुंबई : सागरी सस्तन प्राण्यांचे संरक्षण आणि देशातील मत्स्यव्यवसायाची शाश्वतता यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन संवर्धन आणि उपाययोजना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत सागरी सस्तन प्राणी संवर्धन कार्यशाळेत सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले. यावेळी भारताचा २०२७–२०३२ सागरी सस्तन प्राणी संवर्धन कृती आराखड्याचा मसुदा सादर करण्यात आला. सागरी जैवविविधतेच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावीपणे प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी विविध संस्था आणि समूहांच्या समन्वयातून २०२७–२०३२ साठी प्रभावी सागरी संवर्धन धोरण विकसित करण्याच्या उद्देशाने नुकताच मुंबईच्या भारतीय मत्स्य सर्वेक्षण विभागाकडून (फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया) दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन कफ परेड येथे करण्यात आले होते.

यावेळी भारतीय मत्स्य सर्वेक्षण विभाग, भारतीय वन्यजीव संस्थान, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान संस्था (सीआयएफटी), सागरी सजीव संसाधने व पर्यावरण केंद्र, सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था आदी संस्थेतील तज्ज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. याप्रसंगी भारतीय मत्स्य सर्वेक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. सिजो. पी. वर्गिस, महासंचालक डॉ. श्रीनाथ के. आर, केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे डॉ. संजय पांडे, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव -पश्चिम) डॉ. रविकिरण गोवेकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

प्राण्यांवरील संशोधनात्मक सादरीकरणे -‘राष्ट्रीय आधारभूत सर्वेक्षण, संस्थात्मक आराखडे आणि साठा मुल्याकंन’ या विषयावरील सत्रात भारतातील किनारे, सागरी जैवविविधता संवर्धन, सागरी सस्तन प्राण्यांवरील संशोधन तसेच इतर विषयांवर सादरीकरणे करण्यात आली. तसेच याप्रसंगी आयोजित विविध सत्रात देशभरातील तज्ज्ञ सहभागी झाले होते.

– यावेळी मासेमारीदरम्यान अनवधानाने पकडल्या जाणाऱ्या सागरी सस्तन प्राण्यांबाबत उपाययोजनांची गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच मच्छीमारांचे हित आणि सागरी जैवविविधता यांचा विचार करून वैज्ञानिक आधारावर उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

– स्थानिक नागरिक आणि समूहांनी सागरी जीवांच्या नोंदी, संशोधन आणि संवर्धनात सहभागी होण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंबंधी तसेच डुगॉंग, डॉल्फिन आणि हंपबॅक व्हेल यांसारख्या प्रजातींच्या संशोधन व संवर्धनावर विशेष चर्चा करण्यात आली.