scorecardresearch

“जोड्या स्वर्गात नाही, तर नरकात बनतात;” मुंबई हायकोर्टाची टिप्पणी

एका प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली.

wedding
(file photo)

जोड्या स्वर्गात नाही, तर नरकात बनतात, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने घरगुती वादावर सुनावणी करताना केली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर एका पुरुषाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती, ज्यामध्ये विवाहित जोडपे एकत्र राहण्यास तयार नव्हते आणि हा पुरुष त्याच्या पत्नीचा छळ करत होता आणि हुंड्याची मागणी करत होता.

हे प्रकरण न्यायालयासमोर पोहोचल्यावर दोघांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी केल्याचे दिसून आले. अशा स्थितीत न्यायमूर्ती एस.व्ही. कोतवाल यांनी आदेशात म्हटले आहे की, पती-पत्नी एकत्र राहण्यास इच्छुक नसल्याचे तक्रारींवरून दिसून येते. त्याचवेळी, सुनावणीदरम्यान संतप्त न्यायाधीश कोतवाल यांनी असेही म्हटले होते की, ‘जोड्या स्वर्गात नाही तर नरकात बनतात.’

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका महिलेने तिच्या पतीविरोधात एफआयआर दाखल केला होता. यामध्ये पत्नीने आरोप केला होता की, २०१७ मध्ये त्यांचे लग्न झाले तेव्हा सासरच्या लोकांनी घरातील प्रत्येक सदस्यासाठी एक सोन्याचे नाणे मागितले होते. लग्नात ती मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला.

तक्रारीत पत्नीने दावा केला आहे की, ज्या घरात ती पती आणि 3 वर्षाच्या मुलासह राहते, ते घर खरेदी करण्यासाठी तिनेही सुमारे १३ लाख ५० हजार रुपये दिले होते. तसेच, लोकांसमोर ती वाईट असल्याचं सिद्ध करण्यासाठी पतीने मुद्दाम अंगावर काही जखमांच्या खुणा करून महिलेने मारहाण केल्याचा बनाव केला.

दुसरीकडे, पतीने तक्रारीत म्हटले आहे की, लग्नानंतर तो पत्नीला फिरायला घेऊन मॉरिशसला गेला होता. यासोबतच महागडा फोनही भेट म्हणून दिला होता. घरासाठी त्याने स्वतः ९० हजारांचे कर्ज घेतले होते, असा दावा त्याने केला आहे. पत्नी सतत अत्याचार करत असल्याचं काही व्हॉट्सअॅप चॅटवरून पतीने न्यायालयासमोर दाखवण्याचा प्रयत्नही केला होता.

या प्रकरणी सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती कोतवाल म्हणाले की, या प्रकरणात पतीला ताब्यात घेऊन प्रश्न सुटणार नाही. त्यापेक्षा न्यायालय पतीला तपासात सहकार्य करण्यास नक्कीच सांगू शकते. अशा परिस्थितीत या प्रकरणात पतीला अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाने क्रॉस एफआयआरच्या या प्रकरणात सुनावणी करूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.  

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marriages are made in hell not heaven says bombay high court hrc

ताज्या बातम्या