भारताच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट बनलेल्या  मंगळयान मोहिमेत अनेक अडचणींवर मात करत भारतीय वैज्ञानिकांनी यश मिळवले असले तरी मंगळाच्या अभ्यास करणाऱ्या यानाला अद्यापही अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातील एक मोठा अडथळा नुकताच भारतीय वैज्ञानिकांना यशस्वीरीत्या परतवून लावला. यामुळे मंगळयानाच्या प्रवासात भारताचा आणखी एक यशाचा टप्पा लिहीला गेला आहे.
मंगळयानाच्या प्रवासात नुकताच एक धूमकेतू आडवा येणार होता. याची पूर्वसूचना इस्रोतील वैज्ञानिकांना मिळाल्यामुळे त्यांनी त्यानुसार व्यूहरचना आखली आणि हा अपघात टाळला, अशी माहिती इस्रोचे नुकतेच निवृत्त झालेले अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांनी इंडियन सायन्स काँग्रेसदरम्यान मुलाखतीमध्ये दिली. वैज्ञानिकांनी मंगळाभोवती फिरणाऱ्या यानाची दिशा धूमकेतूच्या विरुद्ध दिशेने वळवली. अशाप्रकारे दिशा बदलण्यातील यश मिळणे हे वैज्ञानिकदृष्टय़ा खूप अवघड असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मंगळयान मंगळाभोवती प्रवास करत असले तरी त्यातील आव्हाने कायम आहेत. हे यान सहा महिनेच चालेल अशी आमची अपेक्षा होती, मात्र आता हे यान जून महिन्यापर्यंत चालू शकेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

आणखी एक परीक्षा
जून महिन्यामध्ये पुन्हा एकदा वैज्ञानिकांची परीक्षा होणार असून त्यावेळेस १२ ते १५ दिवस यानाचा आणि इस्रोतील केंद्राचा संपर्क तुटणार आहे. त्यानंतर पुन्हा आपण यानाशी संपर्क जोडू शकलो तर ते वैज्ञानिकांच्या दृष्टीने खूप मोठे यश असेल असेही राधाकृष्णन म्हणाले. इंडियन सायन्स काँग्रेसच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ अंतराळ वैज्ञानिक प्रमोद काळे यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळेस त्यांनी भारतीय अंतराळ विज्ञानाबद्दल मनसोक्त संवाद साधला.

मानवमोहिमेची तयारी सुरू
अंतराळात मानव पाठविण्यासाठी भारत सज्ज होत असून मंगळयानाच्या यशानंतर या मोहिमेच्या तयारीला सुरुवात करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. आतापर्यंत अंतराळात रोबो पाठवण्यात भारताला यश मिळाले आहे. मानवाला पाठविण्यासाठी वेगळी आव्हाने आहेत. पण या आव्हानांवर मात करत पुढचा प्रवास सुरू झाला आहे.