इस्रोच्या महत्त्वाकांक्षी मंगळयान मोहिमेला मंगळवारी सुरुवात झाली. याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी अनेकांनी टीव्हीकडे डोळे लावले होते. पण काहींना ते शक्य नव्हते. अशांनी इस्रोच्या अधिकृत मंगळयानाच्या फेसबुक पेजवरून त्याचा आनंद लुटला.
इस्रोने मंगळयान मोहिमेसाठीचे फेसबुकपेज ४ ऑक्टोबर रोजी तयार केले होते. याला महिनाभरात ६३,३०५ विज्ञानप्रेमींनी ‘लाइक’ केले होते. या सर्वाना फेसबुकवर मंगळयानाचे लाइव्ह अपडेट्स मिळत होते. रविवारी पहाटे उलट गणती सुरू झाल्यापासून इस्रोने फेसबुकवर ठरावीक वेळेने विविध माहिती पोस्ट करण्यास सुरुवात केली. उड्डाणाआधी ‘अवघे १० सेकंद’ असा संदेश आला आणि एकामागोमाग एक अभिनंदनाच्या कमेंट्स येऊ लागल्या. दुसऱ्या मिनिटाला पहिली पायरी यशस्वीपणे ओलांडली असा संदेश आला. तर तिसऱ्या मिनिटाला दुसऱ्या पायरीबद्दल इस्रोने माहिती पुरवली. याचबरोबर इस्रोने केलेल्या वेबप्रसारणाची लिंकही या पेजवर देण्यात आली होती. यालाही कित्येक हजार हिट्स मिळाल्या होत्या.
३.२३ वाजता ‘मंगळयान यशस्वीपणे पीएसएलव्ही सी-२५ पासून वेगळे झाले आहे.’ हा संदेश फेसबुक पेजवर झळकला आणि तब्बल दीड ते दोन हजार विज्ञान प्रेमींनी तो लाइक केला. यानंतर सातत्याने संदेश येत राहिले. ४.१५ वाजता पुन्हा ‘सौर पंखे आणि परावर्तक यशस्वीपणे तैनात झाले आहेत. यानाने आता पहिली कक्षा ओलांडली आहे. आत्तापर्यंत २४६.९ बाय २३,५६६.६९ किमी प्रवास झाला आहे.’ असा संदेश आला. त्यालाही विज्ञानप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला.
वेबसाइट अनुपलब्ध
इस्रोच्या वेबसाइटवर मंगळयानाच्या प्रक्षेपणाचे ‘थेट वेब प्रक्षेपण’ दाखवण्यात येणार असल्याने अनेकांनी सकाळपासून या साइटवर लॉगइन करण्यास सुरुवात केली. मात्र जेव्हा खरी प्रक्षेपणाची वेळ होती त्यावेळेस लॉगइन करणाऱ्यांना साइट अनुपलब्ध असल्याचा संदेश दिसत होता. मात्र साइटवर एक तासांहून अधिक वेळेचे व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याने अनेकांनी साइट सुरू झाल्यावर तो पाहून समाधान मानले.