मुंबई : दक्षिण मुंबईतील मशीद बंदर परिसरात बनावट विदेशी सिगारेट आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा साठा करून त्यांची विक्री करण्याचा प्रकार पायधुनी पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी ७२ लाख २१ हजार ५५० रुपये किमतीचा माल जप्त केला असून, १९ जणांना अटक केली. हॉटेल स्टार्स येथे २८ ऑक्टोबरला ही कारवाई करण्यात आली.

पायधुनी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक परिसरात गस्त घालत असताना मशीद बंदर पश्चिम येथील हॉटेल स्टार्समध्ये विदेशी सिगारेट आणि ई-सिगारेटचा बेकायदा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. तेथे साठवणूक आणि वितरणाशी संबंधित व्यवहार सुरू असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी कारवाई केली.

छाप्यात पोलिसांनी विदेशी बनावटीच्या ११ हजार ७१० सिगारेटची पाकिटे आणि २ हजार १७२ इलेक्ट्रॉनिक सिगारेट जप्त केल्या. या सर्व मालाची अंदाजित किंमत ७२ लाख २१ हजार ५५० रुपये आहे. जप्त केलेल्या सिगारेट बनावट असल्याचा संशय असून, त्यांचा उत्पादन, पुरवठादार आणि विक्रीसाठी वापरले जाणारे जाळे यांचा तपास सुरू आहे.

१९ जणांना अटक

या प्रकरणी २० ते ४८ वयोगटातील १९ जणांना अटक करण्यात आली. ई-सिगारेटच्या उत्पादनापासून विक्री, वितरण, वाहतूक आणि साठवणुकीपर्यंतच्या विविध बाबींवर केंद्र सरकारच्या २०१९ मधील प्रतिबंधक कायद्यानुसार निर्बंध आहेत. या प्रकरणात जप्त मालाच्या स्वरूपाबरोबरच त्याच्या बेकायदा साठवणुकीमागील आणि विक्रीमागील साखळीचा पोलीस तपास करत आहेत.