मुंबई : गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या उपाययोजनेचा भाग म्हणून मशीद आणि माटुंगा स्थानक परिसरातील चार पादचारी पूल तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयटी मुंबईच्या संरचनात्मक तपासणीत (स्ट्रक्चरल ऑडिट) हे पूल धोकादायक असल्याचे आढळल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मध्य रेल्वेला ही कारवाई करण्याची सूचना केली.

मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नुकताच या पुलांची संयुक्त पाहणी केली होती. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी आयआयटी मुंबईने चारही पुलांचे स्वतंत्र अहवाल सादर केले. या अहवालात पुलांच्या महत्त्वाच्या संरचनात्मक भागांची झीज झाल्याचे आणि गंज आल्याचे निदर्शनास आल्याने ते पादचाऱ्यांच्या वापरासाठी तातडीने बंद करून त्यांची पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. बंद होणाऱ्या पुलांमध्ये मशीद येथील भंडारी पादचारी पूल, मशीद स्थानकावरील पादचारी पूल, माटुंगा येथील भाऊ दाजी रोडवरील समांतर रस्ता फाटक आणि गुरु नानक हायस्कूलजवळील माटुंगा-धारावी पादचारी पूल यांचा समावेश आहे.

गणेशोत्सव काळात रेल्वे स्थानके आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी हे पूल पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात पर्यायी मार्गांचा वापर करून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवासी आणि नागरिकांना केले आहे.