मुंबई : सुरक्षा, स्वच्छता राखण्यासाठी नवनवे शिक्षक, विद्यार्थी, रहिवाशांसाठी वेगवेगळे नियम काटेकोरपणे राबवणाऱ्या मुंबई विद्यापीठाची अवस्था दसरा मेळाव्यानंतर दयनीय झाली आहे. विद्यापीठाच्या कलिना परिसरात वाहनतळासाठी दिलेल्या जागी गुरूवारी कचऱ्याचे ढीग साचले होते. दारूच्या बाटल्या, खरकटे, पाण्याच्या प्लास्टीकच्या बाटल्या इतस्ततछ पसरल्या होत्या. विद्यापीठाने तयार केलेले हेलीपॅडही उखडले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेला दोन लाख रुपये दंड ; २०१९ च्या आदेशासाठी विनाकारण पुनर्विलोकन याचिका केल्याची उच्च न्यायालयाची टिप्पणी

शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेले दोन्ही दसरा मेळावे बुधवारी गाजले. ठाकरे गटाचा मेळावा दरवर्षी प्रमाणे शिवाजी पार्क येथे तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर झाला. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या जवळ असल्याने वाहनतळासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील जागा घेण्यात आली होती. राज्यभरातून हजारो कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित होते. मेळावा झाल्यानंतर विद्यापीठाच्या परिसरात सगळीकडे कचरा पसरला होता. पाण्याच्या बाटल्या, कागद, प्लास्टिकच्या पिशव्या पडल्या होत्या. विद्यापीठाच्या मैदानावर मद्यपान करून कार्यकर्त्यांनी तेथे फेकलेल्या बाटल्यांचाही खच होता. एरव्ही बीकेसीच्या बाजूचे प्रवेशद्वार सुरक्षेच्या कारणासाठी विद्यापीठ प्रशासनाने रहिवाशांसाठीही बंद केले आहे.

मात्र मेळाव्यासाठी आलेले कार्यकर्ते बुधवारी विद्यापीठाच्या आवारात बिनबोभाट इकडे तिकडे फिरत होते, अशी माहिती रहिवाशांनी दिली. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावरही कचरा पसरला होता. कार्यकर्त्यांनी सभास्थानी असलेल्या दुकानात घेतलेल्या टोप्या, शेले मैदानावर पडले होते. या मैदानांची स्वच्छता गुरूवारी दिवसभर सुरू होती. विद्यापीठाच्या आवारात झालेल्या अस्वच्छतेबाबत युवासेनेने आक्षेप नोंदवला आहे. परिसर साफ करण्याची जबाबदारी आता मुंबई महापालिकेवर आणि विद्यापीठावर आली आहे. बीकेसीमधील सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराची मोडतोड केली असल्याचा आरोप युवानसेनेच्या माजी अधिसभा सदस्यांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mass garbage in mumbai university premises after shinde group dussehra rally mumbai print news zws
First published on: 06-10-2022 at 20:26 IST