मुंबईतील कांजूरमार्गमध्ये सोमवारी रात्री भीषण आग लागली होती. सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये ही भीषण आग लागली. आग इतकी मोठी होती की, यामुळे शेजारी असणाऱ्या तीन कंपन्यांनाही आगीचा फटका बसला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस तपास करत आहे. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झालेलं नाही.

कांजूरमार्गमधील डब्बावाला कंपाऊंडजवळ ही भीषण आग लागली होती. आग लागल्यानंतर तिथे सिलेंडर ब्लास्ट होत असल्याने भीतीचं वातावरण पसरलं होतं. आग लागताच कर्मचारी बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसंच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने इमारतीच्या आत असणाऱ्या १० जणांना वेळीच बाहेर काढलं.

आगीची माहिती मिळाल्यानतर आठ फायर इंजिन, चार पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ च्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाला ९.४२ ला आगाची माहिती मिळाली. प्राथमिक तपासानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. मुंबई पोलीस सध्या तपास करत आहेत.