मुंबई : अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाने मुंबईत नुकत्याच केलेल्या शक्तीप्रदर्शनानंतर समाजाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मातंग नेत्यांमधील या वादाला भाजप आमदार विरुद्ध इतर मातंग नेते असे स्वरूप आले असून मोर्चासाठी जमा केलेला निधी आणि महायुती सरकारच्या सोयीने शांततेमध्ये केलेली मोर्चाची सांगता यामुळे हा वाद उद्भवला आहे.
२९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानातील महानिर्धार आंदोलनाला लाखो मातंग कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. राज्यात तीन मातंग आमदार असून तिन्ही आमदार भाजपचे आहेत. मात्र मतभेद नको म्हणून सकल मातंग समाजाच्या झेंड्याखाली आंदोलन करण्याचा निर्णय झाला होता. सुनील कांबळे, जितेश अंतापूरकर आणि अमित गोरखे हे तिन्ही भाजप आमदार मोर्चाच्या अग्रभागी होते. आश्चर्य म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आणि दूरचित्रवाहिन्यांवर मोर्चाच्या जाहिराती होत्या.
माजी आमदार रमेश कदम यांनी मोर्चाचे एक संयोजक सचिन साठे यांच्यावर अनेक आरोप केले असून मोर्चासाठी जमा केलेला कोट्यवधींचा निधी दडवल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुंबईतील मोर्चात कदम यांच्या भाषणावेळी ध्वनीक्षेपक बंद करण्यात आला होता. भाजप आणि शिंदे शिवसेना हे दोन्ही सत्ताधारी पक्ष, स्थानिक आमदार व सरकारी अधिकारी यांच्याकडून मोर्चाला मदत झाली होती. त्यामुळे मोर्चाच्या शिष्टमंडळाने उपवर्गीकरणाची हमी घेताना तडजोड करत समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे.
उपवर्गीकरणाची मागणी झाल्यानंतर बौद्ध आणि मातंग समाजांमध्ये सुप्त संघर्ष उद्भवला होता. त्यातून बौद्ध नेत्यांनी राज्यभर मोर्चे काढले. मातंगांनी आनंदराज आंबेडकर यांच्यावर तर बौद्धांनी अण्णाभाऊंचे वारसदार सचिन साठे यांच्यावर निशाणा साधला होता. निळा आणि पिवळा झेंडा यांच्यात सरळ सरळ हरकत दिसून आली होती. आंबेडकर, आठवले, बडोले या बौद्ध नेत्यांचा उपवर्गीकरणाला विरोध नसून प्रक्रिया पारदर्शक राबवण्याची आणि विद्यमान जनगणनेनंतर अंमलबजावणी करण्याची त्यांची मागणी आहे. उपवर्गीकरणाच्या अंतिम टप्प्यात मात्र मातंग नेत्यांमध्येच संघर्ष उद्भवला असून भाजप विरुद्ध इतर अशी त्याला किनार आहे.
राज्यातील अनुसूचित जातीच्या १२ टक्के लोकसंख्येमध्ये बौद्ध ६६ टक्के, मातंग १९ टक्के आणि चर्मकार १० टक्के आहेत. अनुसूचित जातीमध्ये ५९ जाती असून बौद्ध व चर्मकारांचा उपवर्गीकरणाला विरोध आहे. मातंग समाजाची मात्र उपवर्गीकरणाची आग्रही मागणी आहे. महायुती सरकारने उपवर्गीकरण लागू करण्याची आता मार्च महिन्याची लेखी हमी दिली आहे.
भाजपचे अधिवेशन
मातंग समाजाचे मुंबईतले आंदोलन भाजपचे अधिवेशन होते. भाजप आमदार अमित गोरखे त्याला कारणीभूत आहेत. सरकारच्या सोयीने मोर्चाच्या मागण्या केल्याने समाजाचे नुकसान झाले. – मारोती वाडेकर, सकल मातंग राज्य समन्वयक
पैसा कुठे गेला
७२ मोर्चे काढताना या नेत्यांनी ९५ कोटी निधी जमवला होता. सामाजिक न्याय विभागाकडून व अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून या नेत्यांना कंत्राटे दिली गेलेली आहेत. – रमेश कदम, माजी आमदार व लहुजी साळवे अभ्यास आयोगाचे माजी अध्यक्ष
आरोप निराशेतून
माजी आमदार रमेश कदम यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळातील समाजाच्या पैशाचा अपहार केला. त्यामुळे कदमांना समाजाने दूर केले असून ते सध्या नैराश्यामुळे बेछुट आरोप करत आहेत. – ॲड. राम चव्हाण, सकल मातंग राज्य समन्वयक
