मुंबई: माथाडी कामगारांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कांदा, बटाटा, आणि इतर शेतीजन्य मालाची ६० किलोची गोण आता १० किलोने कमी करण्यात आली आहे. कामगारांना या वजनाचा त्रास होत असल्याने ह्या गोणी ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या असता कामा नये असा नियम शासनाने घातला आहे. काही वर्षापूर्वी या गोणींचे ओझे १०० किलोची होते ते टप्याटप्याने कमी करण्यात आले.

राज्यात ३०५ पेक्षा जास्त कृषि बाजार समित्या आहेत. या बाजार समित्यांमध्ये शेतमाल चढउताराचे काम माथाडी कामगार करतात. मुंबई महानगर प्रदेशातील जेएनपीटी, मुंबई पोट्र ट्रस्ट सारख्या केंद्रीय तसेच खासगी अस्थापनात माथाडी कामगार चढ उताराची कामे गेली अनेक वर्षे करीत आहेत. राज्यात या कामगारांची संख्या दोन लाखापेक्षा जास्त आहे. प्रारंभीच्या काळात माथाडी कामगारांच्या पाठीवरील ओझ्याचे वजन १०० किलो होते.

माथाडी कामगार संघटनेने वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे हे वजन नंतर वीस किलोने कमी करण्यात आले. त्यानंतरच्या ८० किलो वजनही माथाडी कामगारांना पेलता येत नव्हते. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने हे वजन ५० किलो असावे असे स्पष्ट केले आहे. कामगारांची सुरक्षितता आणि स्वास्थ यांना धोका पोहचू नये यासाठी हे वजन ५० किलो योग्य आहे असे मत या संघटनेने व्यक्त केले आहे. गेली २६ वर्षे कामगार संघटना हे वजन कमी व्हावे यासाठी संर्घष करीत आहेत. काही दिवसापूर्वी मंत्रालयात पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्यावेळी कामगार संघटनांनी सध्या असलेल्या ६० किलो वजनाला ही विरोध केला. शासनाने ही मागणी मान्य केली आहे. त्यानुसार सरकारने शासन अध्यादेश काढला आहे. राज्यातील सर्व कृषि बाजार समितीत शेतमालाचे वजन ५० किलो पेक्षा जास्त असता कामा नये, असे आदेश शेतकरी व व्यापाऱ्यांना देण्यात आले आहेत

माथाडी कामगारांसाठी वजन मर्यादा असावी अशी मागणी होती. यापूर्वी हे कामगार १०० किलो वजनाची गोण सहज पाठीवर घेत होते. त्यांच्या पाठीवरचे वजन कमी व्हावे यासाठी कामगार संघटनेने अनेक आंदोलने केली. टप्याटप्याने हे वजन कमी झाले याचा आनंद आहे. – नरेंद्र पाटील, नेते, माथाडी कामगार