मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने माथेरान मिनी ट्रेनच्या सेवेत मोठा बदल केले आहेत. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली नेरळ – माथेरान नॅरोगेज रेल्वे सेवा १५ जूनपासून अंशतः बंद करण्यात येणार असून नेरळ – अमन लॉज विभागातील नियमित प्रवासी सेवा थेट १५ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे.
यामुळे पावसाळ्यात माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांना नेरळहून थेट मिनी ट्रेनचा प्रवास करता येणार नाही. मात्र, माथेरान – अमन लॉजदरम्यान शटल सेवा नियमित सुरू राहणार असल्याने पर्यटकांना या मार्गावर मिनी ट्रेनचा आनंद घेता येणार आहे.
माथेरानची ओळख बनलेली आणि ‘माथेरानची राणी’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही मिनी ट्रेन पर्यटकांना आकर्षित करते. विशेषतः पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या डोंगररांगांमधून होणारा रेल्वे प्रवास पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरतो. मात्र मुसळधार पाऊस, दरड कोसळण्याचा धोका आणि सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी काही काळासाठी मिनी ट्रेनच्या सेवेत बदल करण्यात येतो.
पर्यटकांना पर्यायी वाहतुकीचा आधार
नेरळ – अमन लॉज दरम्यानची रेल्वे सेवा बंद राहणार असल्याने पर्यटकांना या कालावधीत रस्ता मार्ग, टॅक्सी किंवा इतर उपलब्ध वाहतुकीचा वापर करून अमन लॉजपर्यंत पोहोचावे लागणार आहे. तेथून पुढे माथेरानपर्यंत शटल ट्रेनची सुविधा उपलब्ध असेल.
शनिवार – रविवारी विशेष फेऱ्या
पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने शनिवार आणि रविवारी माथेरान – अमन लॉज मार्गावर अतिरिक्त विशेष फेऱ्यांचीही व्यवस्था केली आहे.
डब्यांची रचना
सर्व शटल गाड्या तीन द्वितीय श्रेणी डबे, एक प्रथम श्रेणी डबा आणि दोन द्वितीय श्रेणी कम-लगेज व्हॅन अशा संरचनेत चालविण्यात येणार आहेत.
दैनंदिन माथेरान – अमन लॉज शटल सेवा
माथेरान येथून रोज सकाळी ८.२०, सकाळी ९.१०, सकाळी ११.३५, दुपारी २, दुपारी ३.१५, सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. ही गाडी अमन लॉज अनुक्रमे सकाळी ८.३८, सकाळी ९.२८, सकाळी ११.५३, दुपारी २.१८, दुपारी ३.३३, सायंकाळी ५.३८ वाजता पोहचेल.
अमन लॉज येथून रोज सकाळी ८.४५, सकाळी ९.३५, दुपारी १२, दुपारी २.२५, दुपारी ३.४०, सायंकाळी ५.४५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे अनुक्रमे सकाळी ९.०३, सकाळी ९.५३, दुपारी १२.१८, दुपारी २.४३, दुपारी ३.५८, सायंकाळी ६.०३ वाजता पोहचेल.
शनिवारी-रविवारी माथेरान विशेष गाडी सकाळी १०.०५, दुपारी १.१० वाजता अमन लॉजसाठी सुटेल. तसेच अमन लॉज येथून विशेष गाडी सकाळी १०.३०, दुपारी १.३५ वाजता सुटेल.
