मुंबई : पुण्यातील एका महाविद्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेशेजारी लावलेली पंतप्रधानांची प्रतिमा काढून टाकल्यानंतर मनसेचे अमित ठाकरे वादात सापडले आहेत. या घटनेचे पडसाद मुंबईत देखील उमटले असून मंगळवारी माटुंगा परिसरात मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. या घटनेवरून आता पुन्हा आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यास नुकतेच मनसेचे नेते अमित ठाकरे गेले होते. त्यावेळी महाविद्यालयातील एका भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लावण्यात आली होती.
संबंधित बाब निदर्शनास येताच अमित ठाकरे यांनी महापुरुषांच्या प्रतिमेशेजारची मोदींची प्रतिमा उतरविण्यास सांगितले. त्यानुसार कार्यकर्त्यांनी तातडीने पंतप्रधान मोदींचा फोटो खाली उतरवला. त्या प्रकरणावरून सध्या नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाकडून माहिममध्ये मंगळवारी आंदोलन केले जात असताना गोंधळ झाला.
शिवतीर्थ आणि मनसेच्या कार्यालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अमित ठाकरे तसेच मनसेविरोधात घोषणाबाजी करत आंदोलक शिवतीर्थाकडे निघाले असताना मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या वादाचे काहीच क्षणात हाणामारीत रूपांतर झाले. त्यावेळी भाजपच्या अक्षता तेंडुलकर, जितेंद्र राऊत, मनसेचे गजानन काळे उपस्थित होते. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि माटुंगा – माहीम पोलीस ठाण्यात नेले. दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. सुमारे तास – दीड तासाने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सोडले.
