मुंबई : मध्य रेल्वेच्या माटुंगा कारशेडमधील एका रेल्वे डब्याला आग लागली. ही घटना मंगळवारी दुपारी ३.१० वाजता घडली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दल येऊन, दुपारी ३.५५ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यास त्यांना यश आले. आगीच्या भडक्यात डब्याचा ६० ते ७० टक्के भाग जळला. वेल्डिंगची कामे सुरू असताना, ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.
माटुंगा कारशेडमध्ये लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) शयनयान रेल्वे डबा उभा होता. यावेळी या परिसरात स्वच्छतागृहात वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंगच्या ठिणग्यांमुळे जवळच्या साहित्याने पेट घेतली. यात शयनयान डब्याला आग लागली. डब्याला तत्काळ मोकळ्या जागेत नेण्यात आल्याने इतर कोणत्याही डब्याचे किंवा कारशेडमधील पायाभूत सुविधांचे नुकसान झाले नाही. परंतु, जोरदार वारा आणि डबा विनावातानुकूलित असल्याने, आगीचा भडका वाढला. आगीमुळे डब्याच्या वरील भाग ७० टक्क्यांनी जळाले. तर, डब्याखालील भाग सुरक्षित राहिला.
आगीची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, स्थानिक कर्मचारी आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी डब्याचे मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या भडक्यात डब्याचा बहुतांश भाग जळून गेला. दरम्यान, या घटनेनंतर मध्य रेल्वेकडून सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. तसेच, या आगीच्या घटनेमागे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
माटुंगा कारशेडमध्ये उभ्या असलेल्या एका एलएचबी शयनयान डब्याला आग लागली. ही घटना मंगळवारी दुपारी ३.१० वाजता घडली. या घटनेत शयनयान डब्याच्या वरील भाग ६० ते ७० टक्के जळाला. या घटनेत कोणत्याही प्रकारची इजा कोणत्याही व्यक्तीला झाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दल येऊन त्यांनी दुपारी ३.५५ वाजता आग आटोक्यात आणली. सर्व रेल्वेगाड्या सुरळीत सुरू आहेत. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, स्वच्छतागृहात वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंगच्या ठिणग्यांमुळे जवळच्या साहित्याने पेट घेतला. – डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवरील कुर्ला यार्डमधील इएमयू साइडिंग येथे उभ्या असलेल्या एका कचरा वाहून नेणाऱ्या मक स्पेशल रेकला जानेवारी २०२६ मध्ये आग लागण्याची घटना घडली होती.
