मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी–बोरिवलीदरम्यान धावत्या लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात झालेल्या मयंक लोहार (२२) हत्याकांडानंतर रेल्वे पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. संशयित प्रवाशांच्या बॅगची कसून तपासणी, रेल्वे स्थानकांवरील गर्दुल्ल्यांविरोधात विशेष कारवाई करण्यात येत असून लोकलमधून धारदार अथवा विविध कामांसाठी आवश्यक अवजारे घेऊन प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून २३ जून रोजी आरोपी रोशन सुवर्णा याने मयंक लोहार याची चाकूने भोसकून हत्या केली होती. या गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू रेल्वे पोलिसांनी जप्त केला असून आरोपीची पोलीस कोठडी ६ जुलैपर्यंत वाढवली आहेआरोपी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हा चाकू आपल्या बॅगेत बाळगत असल्याचे चौकशीत उघड झाले. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी संपूर्ण उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर सुरक्षा तपासणी अधिक कठोर केली आहे.
सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रत्येक रेल्वे पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी आणि दहा कर्मचाऱ्यांची विशेष पथके सकाळी व सायंकाळी संशयित प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करीत आहेत. या तपासणीदरम्यान अनेक प्रवाशांकडे स्क्रू-ड्रायव्हर, कटर, धारदार अवजारे आणि इतर हार्डवेअर साहित्य आढळून आले. अशा वस्तूंचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता, गरज नसल्यास लोकलमधून अशा साहित्याची वाहतूक टाळावी, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, रेल्वे स्थानके आणि परिसरात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या गर्दुल्ल्यांविरोधातही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. महिला आणि इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा व्यक्तींवर गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून मध्य आणि पश्चिम रेल्वे परिसरातील तब्बल ११५ गर्दुल्ल्यांवर अमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (एनडीपीएस), १९८५ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
प्रवाशांमध्ये सुरक्षाविषयक जनजागृती करण्यासाठी समाज माध्यमांचाही प्रभावी वापर केला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या हार्डवेअरच्या वस्तू लोकलमधून नेण्याचे टाळावे, तसेच संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू दिसल्यास तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येणार आहे.
प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर बॅग तपासणी मोहीम सुरू आहे. रेल्वे हद्दीतील गर्दुल्ल्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे. प्रवासी संघटनांशी चर्चा करून नव्या उपाययोजना राबविण्यात येत असून, रेल्वे प्रशासनाकडे सुरक्षाविषयक साधनसामग्री वाढविण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रवाशांनी लोकलमधून प्रवास करतातना विविध कामांसाठी आवश्यक अवजारे सोबत बाळगू नये, असे आवाहन केले आहे.- एम. राकेश कलासागर, लोहमार्ग पोलीस आयुक्त
