मुंबई : मायणी वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटकेत असलेले श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक आप्पासाहेब देशमुख यांचे पुत्र दीपक देशमुख यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला. न्यायालयाने त्यांची अटक बेकायदा ठरवून त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला देशमुख यांनी आव्हान दिले होते. तसेच, अटक बेकायदा ठरवून जामिनावर सुटका करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने देखमुख यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सकृतदर्शनी आढळून येत असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच, त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा – राजकारण्यांचा आखडता हात, निवडणूक आचारसंहितेमुळे दिवाळी पहाटला अनुपस्थिती
हेही वाचा – मुंबई : दिवाळीनिमित्त घरात केलेली साफसफाई पडली महागात, कशी ते वाचा आणि सावध व्हा
देशमुख यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा करोना काळातील रुग्णांच्या नावे निधी लाटल्याचा आरोप केला होता. तसेच, गोरे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेची दखल घेऊन गोरे यांच्यावरील आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यानच्या काळात ईडीने देशमुख यांना मायणी वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटक केली. त्यामुळे, ही अटक राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता.