लॉकडाउन हळूहळू शिथिल केला जात असताना करोनाचा प्रसार वेगानं होत असल्याचं भयावह चित्र समोर येत आहे. ऑगस्टच्या मध्यावधीपासून देशातील व राज्यातील करोना रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. त्यात आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. वाढत असलेल्या रुग्णसंख्येवरून भाजपा नेत्यांनं मुंबई महापालिकेला जबाबदार ठरवत सवाल उपस्थित केला आहे.

मुंबईमधील रुग्ण दुपटीचा काळ आणि रुग्ण करोनामुक्त होण्याच्या प्रमाणात घसरण झाल्याने चिंता वाढू लागली आहे. रविवारी एक हजार ९१० नवे रुग्ण आढळले असून, ३७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात मुंबईतील रुग्ण दुपटीचा काळ ८० दिवसांच्या वर गेला होता. तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली होती. मात्र, शुक्रवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्क्यांवर, तर रुग्ण दुपटीचा काळ ७१ दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईतील वाढत्या करोना रुग्णसंख्येवरून भाजपाचे नेते किरीट सौमेय्या यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सौमेय्या यांनी ट्विट केलं आहे. मुंबईत गेल्या आठवड्यात ११ हजार ४५ जणांना करोनाची बाधा झाल्याचं म्हटलं आहे. “गेल्या आठवड्यात मुंबईत ११०४५ करोना बाधित झाले. एक नवीन उच्चांक. मुंबईकरांची दिशाभूल करणारे महापौर आणि महापालिका आयुक्त आता माफी मागणार का?,” असा सवाल सौमेय्या यांनी उपस्थित केला आहे.

गणेशोत्सव काळात झालेल्या गर्दीनंतर आता मुंबईतील चित्र वेगानं बदलू लागली आहे. मुंबईमधील रुग्णसंख्या एक लाख ५५ हजार ६२२ वर पोहोचली आहे. रविवारी एक हजार ९१० जणांना करोनाची बाधा झाली, तर विविध रुग्णालयांमध्ये दाखल असलेले ९११ रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत सात हजार ८६६ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या २३ हजार ९३० वर पोहोचली आहे.