राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला आहे. या रूग्णावर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवलं जात होतं. त्याचे नमुने जीनोम चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. या रूग्णाचं वय ३३ वर्षे असून तो २४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून कल्याण-डोंबिवलीत आला दुबई आणि दिल्लीमार्गे तो मुंबईत दाखल झाला होता. तो ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला राज्यातील पहिला रूग्ण ठरला आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“नक्कीच चिंता वाढली त्याबद्दल काहीच दुमत नाही. परंतु तरी देखील घाबरून न जाता. नागरिकांनी जी कायम सजगता दाखवलेली आहे. त्यानुसार जर दिलेली नियमावलीचे आपण नीट पालन केले, तर आपण या ओमायक्रॉनला थोपवू शकतो. करोनाची दुसरी लाट आपण मध्यावर थोपवली, तिसरी लाट येऊच दिली नाही. मी जे चार दिवसांपासून सांगत आहे, आज हा आढळलेला रूग्ण दक्षिण अफ्रिका- दुबई-दिल्ली मार्गे महाराष्ट्रात आला. याचा अर्थ काही असे प्रवासी वेगवेगळ्या राज्यात उतरून, आपल्या महाराष्ट्रात, मुंबईत, आपल्या आसपासच्या शहरांमध्ये येऊ शकतात. म्हणूनच मला वाटतं सर्व नागरिकांनी याबद्दल एक सजगता ठेवली पाहिजे.” असं एबीपी माझाशी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

Omicron in Maharashtra : चिंताजनक, करोनाचा ओमायक्रॉन विषाणू महाराष्ट्रात दाखल, कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण

तसेच, “आता त्या रूग्णाची सौम्य लक्षणं असल्याचं समजतय आणि त्यावर उपचार देखील सुरू आहेत. परंतु तरी देखील हा ओमायक्रॉन जलदगतीने पसरतो, ही भीती बघता सर्वांनी सजग होणं, घाबरून न जाता दिलेल्या नियमांचे नीट पालन केले पाहिजे. केंद्र, राज्य, महानगरपालिका आजही सतर्क आहेत. आमची व्यवस्था आम्ही नीट करून ठेवलेली आहे. तरी देखील लोकांनी काळजी घ्यावी व सजग रहावं. सर्वांनी लस घ्यावी.” असंही आवाहन यावेळी महापौर पेडणेकर यांनी केलं.