माझगाव येथील व्यापाऱ्यांचे ३५ लाख रुपये लुटल्याप्रकरणी एखाद्या माहीतगार व्यक्तीचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळावरील दोन सीसीटीव्ही कॅमरे बंद असल्याचे आढळले आहे. बुधवारी संध्याकाळी माझगावच्या हँकॉक पुलाजवळ हिरे व्यापाऱ्याच्या दोन कर्मचाऱ्यांना लुटण्यात आले होते.
ऑपेरा हाऊस येथील एका व्यापाऱ्याकडे काम करणारे संदीप पाठारे (४३) आणि अशोक झवेरी (५२) हे दोन कर्मचारी पैसे घेऊन कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. संध्याकाळी चारच्या सुमारास माझगावच्या हँकॉक पुलाजवळ टॅक्सी पकडत असताना मोटारसायकलीवरून आलेल्या चौघांनी त्यांच्या हातातील रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला होता.
यावेळी लुटारूंनी केलेल्या चाकू हल्ल्यात संदीप पाठारे किरकोळ जखमी झाले होते. भायखळा पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु दोन सीसीटीव्ही कॅमेरे पावसामुळे बंद होते तर इतर कॅमऱ्यात ही घटना चित्रित झाली नाही. ज्या प्रकारे लूट झाली ते पाहता कुण्या माहीतगार इसमाचा सहभाग असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.