मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणांबाबत शासनाने अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. कोळीवाड्यांप्रमाणे गावठाणांकडेही दुर्लक्ष झाल्याने दुरावस्था झाली आहे. अशातही आपले वेगळेपण जपलेले माझगाव येथील म्हातारपाखाडी हे गावठाणही आता उत्तुंग इमारतीच्या गर्दीत हरवत चालले आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली या गावठाणावरही भविष्यात संक्रात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माझगावमधील ‘म्हातारपाखाडी’ हे गावठाण गेले २५ ते ३० वर्षे चर्चेत आहे ते त्याला मिळालेल्या ‘वारसा परिसरा’च्या दर्जामुळे. मुंबईतील गगनचुंबी इमारतींच्या गर्दीत दोनशे ते तीनशे वर्षांची परंपरा असलेले एक गाव शहरात आपले अस्तित्त्व आजही टिकवून आहे. मोजकी पण आकर्षक पद्धतीने रंगविलेली घरे, अरुंद पण स्वच्छ गल्ल्या आणि ईस्ट इंडियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, परंतु उत्तम मराठी बोलणाऱ्या समाजाची वस्ती हे म्हातारपाखाडीचे वैशिष्ट्यच.
माझगावात डॉकयार्ड रोड स्टेशनपासून अगदी काही मिनिटांवरच बॅरिस्टर नाथ पै मार्गावरचे दोन रस्ते म्हातारपाखाडीकडे जातात. गनपावडर रोड आणि म्हातारपाखाडी रोड. गजबजलेल्या याच रस्त्यांवरून पुढे गेले की छोट्या गल्ली-बोळात लपले आहे मुंबईतील एक गावठाण- म्हातारपाखाडी. ‘माझगाव व्हिलेज’ असे नामकरण झालेला हा परिसर म्हातारपाखाडी नावाच्या गावाचे दर्शन घडवतो. ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असे एक वारसा गाव.
म्हात्रे कुटुंबीयांचे गाव, म्हातारीचे गाव किंवा माथ्यावरचे गाव- म्हातारपाखाडीच्या नावामागे अशा अनेक कथा असल्याचे रहिवासी अभिमानाने सांगतात. हे गाव मुंबईच्या धावपळीपासून दूर आपले जुने अस्तित्व टिकवून आहे. मुंबईतील हा भाग गेट वे ऑफ इंडियापेक्षाही जुना आहे, असे याबाबत १९९५ मध्ये संवर्धन (कॉन्झर्व्हेशन) वास्तुरचनाकार पंकज जोशी यांनी तयार केलेल्या एका अहवालात आढळते. या परिसराला मुंबईतील ‘मिनी गोवा’ही म्हटले जाते. मुंबई मेट्रोपोलिटन रिजन – हेरिटेज कॉन्झर्व्हेशन सोसायटीने (एमएमआर एचसीएस) हे गावठाण वारसा स्थळ म्हणूनही सूचीबद्ध केले आहे. गावाचे नाव ‘ म्हातार ‘ (वृद्ध) आणि ‘ पाखडी ‘ (गाव) या शब्दांवरून तयार झाले आहे,अशी अहवालात नोंद आढळते.
पंकज जोशी हे आता अर्बर सेंटरचे संचालक आहेत. त्यांनी १९९५ मध्ये म्हातारपाखाडीचा सर्वंकष अभ्यास केला आहे. त्यावेळी त्यांनी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) अहवाल सादर केला असून तो आजही उपलब्ध आहे. जोशी म्हणतात : पोर्तुगीजांनी त्यावेळी गावातील कर गोळा करण्याची जबाबदारी गावातील पंचायतीच्या प्रमुख व्यक्तीवर टाकली. म्हातारा म्हणजे नुसताच वयोवृद्ध नव्हे तर अनुभवानेही हुशार या अर्थाने ‘म्हातार’ उल्लेख आहे.
मुंबईत प्रामुख्याने मासेमारी करणारा कोळी समाज, भंडारा आणि कुणबी समाज यांचेच प्राबल्य होते. त्यानुसार घरांची रचनाही होती. उदाहरणार्थ, कोळी समाजाला मासेमारीसाठी आवश्यक असलेली जाळी पसरविण्यासाठी जागा लागत असल्यामुळे व्हरांडा मोठा लागत असे. त्यामुळे या घरांसमोर मोठा व्हरांडा दिसेल. भंडारी समाज प्रामुख्याने नारळ, फळांच्या व्यवसायात असल्यामुळे त्यांच्या घरासमोर चौकोनी व्हरांडा आढळेल तर कुणबी समाजाच्या घरासमोर छत असलेले तसेच कॅन्टिलिव्हर आढळेल. ईस्ट इंडियन समाजाची घरे अशाच पद्धतीची आहेत आणि ती म्हातारपाखाडीत आढळतात. दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी पोर्तुगीजांच्या काळात माझगाव बंदर विकसित होऊ लागले, तेव्हा वसई-विरार परिसरातील लोक या ठिकाणी स्थलांतरित झाले. साहजिकच म्हातारपाखाडीवर आजही पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव दिसतो आणि गोव्याचीच आठवण होते.
घरांची स्थापत्यशैली पोर्तुगीज पद्धतीची आहे. रंगीबेरंगी, आकर्षक व टुमदार एक वा दोन मजली घरांभोवती एकेकाळी फळबागा होत्या. कालांतराने फळबागा नाहिशा झाल्या असल्या तरी आजही या घरांभोवती विविध प्रकारची फुलझाडे आढळतात. आकर्षक रंगरंगोटी आणि लाकडी जिने, काही घरासमोर व्हिक्टोरिया राणीची प्रतिकृती आढळते. एकमेकांना खेटून असलेली घरे, ‘कीपसेक’, ‘लायन्स डेन’ अशी घरांची नावे, ओसरी, लाकडी जिने आणि खिडक्या वा मुख्य दरवाजांसमोर गोव्यातील ख्रिस्ती समाजाची आठवण करुन देतो तेव्हा आपण खरोखरच मुंबईत आहोत का असा प्रश्न पडतो. २० ते २५ मिनिटांत तुम्ही या गावाचा सर्व गल्ल्यांतील फेरफटका पूर्ण करता.
आजुबाजुला उभ्या राहत असलेल्या गगनचुंबी इमारतीच्या गर्दीत हे गाव किती काळ टिकणार आहे, असा प्रश्न पडतो. कारण आता या गावातच काही इमारतींचे काम सुरु असल्याचे दिसते. आता आतील अरुंद रस्त्यांवर उभी वाहने आणि गावाच्या वेशीलगत नव्या उंच इमारती अशा मोजक्या खुणा सोडल्या तर आपण काही शतके मागे गेल्याचाच भास फेरफटका मारताना सहज होतो. पाच-सात पिढ्या पाहिलेल्या या घरांचा इतिहास म्हातारपाखाडीतील मूळ रहिवासी जपून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. लोकमान्य टिळकांचे सहकारी जोसेफ ‘काका’ बाप्टिस्टा, मुंबईचे माजी महापौर डॉ. एम. यू. मास्करेन्हस हे म्हातारपाखाडीतीलच. १८७५ मध्ये उभारण्यात आलेला क्रॉस म्हातारपाखाडीची आणखी एक ओळख आहे.
पंकज जोशी यांनी १९९५ मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार, मुंबईत ६० वारसा परिसर होते. परंतु वारसा इमारतींसंदर्भात कडक नियम नसल्याने पुनर्विकास रोखणे कठीण आहे. म्हातारपाखाडीला हेरिटेज दर्जा असला तरी हेरिटेज सोसायटीकडे फारसे अधिकार नाहीत. कुणी घर विकत असेल तर त्याला थांबवू शकत नाही. खोताच्या वाडीत निम्म्याहून अधिक घरांची जागा इमारतींनी घेतली आहे. म्हातारपाखाडीत अजूनही ५० ते ६० कौलारू घरे टिकून आहेत.
म्हातारपाखाडी हे गाव अजूनही टिकून राहण्यामागील कारण येथील एक जुने रहिवाशी स्टॅनली बॅप्टिस्टा नेमक्या शब्दांत सांगतात. म्हातारपाखाडीतील अनेकजण घरे विकून परदेशी स्थलांतरित झाले. परंतु त्यापैकी काहीजण परतले आहेत. घराची डागडुजी सर्वांनाच परवडत नाही. पण आपले गावही सोडवत नाही. पुढच्या पिढीचे लोकही वारसा टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हातारपाखाडीतही बेकायदा बांधकामे ही मोठी समस्या आहे. सरकारकडून आम्हाला मदतीची अपेक्षा नाही, पण हे गाव पर्यटन स्थळ बनवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. हरवत चाललेली जुनी मुंबई पाहण्यासाठी पर्यटक म्हातारपाखाडीला भेट देतात. कला, स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थीही इथं अधूनमधून दिसतात. त्यांच्यासाठी तरी मुंबईसारख्या शहरातले हे गाव टिकवले पाहिजे, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.
माझगाव व्हिलेज…
म्हातारपाखडीमध्ये प्रामुख्याने ईस्ट इंडियन लोकांचे वास्तव्य आहे. ईस्ट इंडियन म्हणजे भारताच्या पुर्वेला राहणारे लोक नव्हेत तर ही मंडळी ईस्ट इंडिया कंपनीत वरच्या हुद्यांवर होती. मूळचे हे मराठी भाषिक पुढे पोर्तुगीज आल्यानंतर रोमन कॅथोलिक आणि ब्रिटिशांच्या काळात उत्तम इंग्रजी येत असल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीत स्थिरावले. सुरुवातीला म्हातारपाखडी ही बंदरावर आणि जवळपास काम करणाऱ्या लोकांसाठी निवासी वस्ती म्हणून विकसित झाली.
माझगाव उपनगरामार्फत शहरात झालेल्या औद्योगिक विकासामुळे या गावाच्या वस्तीचा विकास झाला. परंतु म्हातारपाखाडीने आपले अस्तित्व जपले. या परिसरात फेरफटका मारताना चांभाराचे जुन्या पद्धतीतील दुकान आणि जुनी विहिर आजही पाहायला मिळते. या गावात शिरण्यासाठी तीन ते चार अरुंद रस्ते आहेत. या प्रत्येक रस्त्याच्या सुरुवातीला भगव्या रंगाने रंगवलेली कमान असून ‘माझगाव व्हिलेज’ असे त्याचे नामकरण झाल्याचे दिसते. मात्र रस्त्याचे नाव ‘म्हातारपाखाडी रोड’ असेच आहे.
nishant.sarvankar@expressindia.com
