मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षातर्फे एमबीए / एमएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केलेल्या सीईटीच्या पहिल्या दिवशी काही केंद्रांवर तांत्रिक बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. मुंबईसह वर्ध्यातील काही केंद्रांवर परीक्षा काहीशी उशिराने सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. मात्र, परीक्षा उशिरा सुरू झाली, तरी विद्यार्थ्यांना नियोजित वेळ पूर्ण दिल्याने त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान झाले नसल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
यंदा एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांसाठीच्या सीईटीसाठी विद्यार्थ्यांना दोन संधी देण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिली परीक्षा ६ ते ८ एप्रिल या काळात विविध सत्रांमध्ये होणार आहे. सोमवारी सकाळी मुंबईतील माटुंगा भागातील एका महाविद्यालयात परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक बिघाडामुळे तब्बल २० ते २५ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. मुंबईसह वर्ध्यातील काही केंद्रांवरही परीक्षा सुरू होण्यास १५ ते २० मिनिटांचा विलंब झाला. पहिल्याच दिवशी पहिल्याच सत्रात ही गडबड झाली असली, तरी दुसऱ्या सत्रातील परीक्षांबाबत कोणतीही तक्रार आली नाही.
ही परीक्षा संगणकाधारित असते. त्यामुळे विद्युत पुरवठा, इंटरनेट कनेक्शन, आदी अनेक गोष्टींवर या परीक्षेचे यश अवलंबून असते. कधीकधी सुरुवातीला यात काही तांत्रिक गोंधळ संभवू शकतो. पण त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत नाही. परीक्षा सुरू झाली की त्या वेळेपासूनच परीक्षेची वेळ गणली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी पूर्ण वेळ मिळतो, असे सीईटी कक्षातर्फे सांगण्यात आले.
पहिल्या दिवशी ८९.४८ टक्के उपस्थिती
एमबीए / एमएमएस सीईटीच्या पहिल्या दिवशी राज्यभरातून एकूण ५२,६१२ विद्यार्थ्यांपैकी ४७,०७९ विद्यार्थी उपस्थित राहिले, म्हणजेच एकूण उपस्थिती ८९.४८ टक्के नोंदवली गेली. सकाळच्या सत्रात २६,०७६ पैकी २३,१०१ विद्यार्थी (८८.५९%) उपस्थित होते, तर दुपारच्या सत्रात २६,५३६ पैकी २३,९७८ विद्यार्थी (९०.३६%) परीक्षेला बसले. या दिवशी एकूण ५,५३३ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १७९ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली असून, एकूण १,३२,८३८ विद्यार्थ्यांनी यंदा नोंदणी केली आहे.
