मुंबई : दिव्यांग प्रवर्गतील कायमस्वरूपी युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिटी (यूडीआयडी) कार्ड नसून तात्पुरते यूडीआयडी कार्ड किंवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र असले तरी या विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे. मात्र, संबंधित दिव्यांगत्व ‘प्रगतिशील’, ‘अप्रगतशील’ किंवा ‘सुधारणा होण्याची शक्यता नाही’ या प्रकारात मोडत असल्यासच ही सवलत लागू राहणार आहे. मात्र अंतिम पात्रता वैद्यकीय मूल्यांकन मंडळाच्या तपासणीनंतरच निश्चित होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांच्याकडे वैध कायमस्वरूपी यूडीआयडी कार्ड असणे आवश्यक होते. मात्र दिव्यांग सक्षमीकरण विभागाने १७ डिसेंबर २०२५ मध्ये यात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ‘प्रगतिशील’, ‘अप्रगतशील’ किंवा ‘सुधारण्याची शक्यता नसलेल्या’ दिव्यांगत्वाच्या प्रकरणांमध्ये प्रमाणपत्र तात्पुरत्या स्वरुपाचे असले तरी त्यांना वैधानिक लाभ मिळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. याच तत्त्वाची अमलबजावणी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत करण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घेतला आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या अर्जाचा प्रवेशासाठी विचार करणे बंधनकारक राहणार आहे.
२७ जुलै २०२६च्या मूळ मार्गदर्शक सूचनांचाच हा निर्णय अविभाज्य भाग मानला जाईल. देशभरातील एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एकसमान आणि न्याय्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सुधारण्याची शक्यता नसलेल्यांसाठी फेरमूल्यांकन
ज्या उमेदवारांच्या तात्पुरत्या यूडीआयडी कार्डावर दिव्यांगत्वाची स्थिती ‘सुधारण्याची शक्यता’ असे नमूद असेल, त्यांच्या प्रकरणात मात्र स्वतंत्र फेरमूल्यांकन केले जाईल. हे मूल्यांकन १२ मार्च २०२४ च्या अधिसूचनेनुसार करण्यात येणार असून, त्याचबरोबर उमेदवाराची आवश्यक कार्यक्षमताही तपासली जाणार आहे.
कार्यक्षमतेवर अंतिम निर्णय
तात्पुरते असो वा कायमस्वरूपी यूडीआयडी कार्ड, प्रत्येक उमेदवाराची कार्यात्मक क्षमता तपासण्याची जबाबदारी वैद्यकीय मूल्यांकन मंडळाचीच राहणार आहे. उमेदवार एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी आवश्यक शारीरिक व कार्यात्मक निकष पूर्ण करतो की नाही, याची पडताळणी झाल्यानंतरच पात्रतेचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
