मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमबीबीएस व बीडीएस प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित वेळापत्रकानुसार तात्पुरती गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. या दोन्ही अभ्यासक्रमासाठी राज्यभरातून ३५ हजार ७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या तपशीलांबाबत तक्रार अथवा हरकत नोंदविण्यासाठी १९ ते २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. गुणवत्ता यादीतील तपशीलामध्ये कोणतीही तफावत किंवा त्रुटी आढळल्यास विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनद्वारेच तक्रार अथवा हरकत नोंदवावी. यासाठी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये स्वतंत्र तक्रार निवारण लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ई-मेलद्वारे पाठविलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही.
विद्यार्थ्याला फक्त एकदाच तक्रार किंवा हरकत नोंदविता येणार आहे. मात्र, एकाच तक्रारीमध्ये एकापेक्षा अधिक बाबींविषयी हरकत नोंदविण्याची मुभा आहे. लिंग, प्रवर्ग, निर्दिष्ट आरक्षण आदी बाबींमध्ये एकाच वेळी दुरुस्तीची मागणी विद्यार्थ्यांना करता येईल. तक्रार अथवा हरकत अंतिम स्वरूपात सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व तपशील पुन्हा तपासणे आवश्यक आहे. तक्रार एकदा सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. तसेच त्यानंतर नवीन बाब समाविष्ट किंवा आधीची बाब वगळण्याची संधीही मिळणार नाही. उमेदवाराला नोंदवलेली कोणतही हरकत मागे घ्यायची असल्यास त्याबाबतचे साध्या कागदावरील स्वाक्षरीयुक्त हमीपत्र अथवा घोषणापत्र समर्थनार्थ कागदपत्र म्हणून सादर करावे लागणार आहे. नोंदणी अर्जात सादर केलेल्या तपशीलामध्ये दुरुस्ती किंवा बदलाची मागणी करताना त्याच्या समर्थनार्थ आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. संबंधित कागदपत्रांशिवाय केलेल्या दुरुस्तीच्या मागणीचा विचार केला जाणार नाही. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल अथवा दुरुस्ती करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचेही सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रत्येक तक्रारीसाठी संबंधित कागदपत्र आवश्यक
उमेदवाराने ज्या बाबींमध्ये बदल किंवा दुरुस्तीची मागणी केली आहे, त्या प्रत्येक दाव्यासाठी संबंधित समर्थनार्थ कागदपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. एका दाव्यासाठी एकापेक्षा अधिक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध असेल. मात्र, केवळ कागदपत्रे अपलोड केल्याने दावा आपोआप मंजूर होणार नाही. अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच संबंधित दावा किंवा बदल ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ योग्य, वैध आणि संबंधित कागदपत्रेच अपलोड करावीत.
ज्या उमेदवारांनी कोणत्याही कागदपत्राची पावती अपलोड केली आहे, त्यांनी विशेष नोंद घ्यावी. जात वैधता प्रमाणपत्राव्यतिरिक्त इतर कोणत्याही कागदपत्राची पावती ग्राह्य धरली जाणार नाही. अशा पावतीच्या आधारे संबंधित तक्रार मान्य केली जाणार नाही. तसेच, खुल्या प्रवर्गातून आरक्षित, अथवा अल्पसंख्याक इत्यादी प्रवर्गामध्ये बदल करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रवेश माहिती पुस्तिकेत नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या आधारेच तक्रार अथवा हरकत नोंदवावी.
