मुंबई :लमहाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीस ६ ते १२ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतर सीईटी कक्षाने या दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीसाठी १५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेपर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल. राज्यभरातून आतापर्यंत ३३ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.

वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमएमसी)अखिल भारतीय कोट्याच्या प्रवेशासाठी असलेल्या जागांसाठी प्रवेशाच्या नोंदणीला दिलेल्या मुदतवाढीच्या पार्श्वभूमीवर सीईटी कक्षाने राज्याच्या कोट्यातील वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदतवाढ १५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे.

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमासाठी २०२६ मध्ये जे विद्यार्थी नीट प्रवेश परीक्षेमध्ये पात्र ठरले आहेत, ते विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करण्यास पात्र ठरणार आहेत. विद्यार्थ्यांनी पोर्टलवर सर्व मूळ आवश्यक कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी, तसेच कागदपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रासह पडताळणी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक

प्रक्रियासुधारित मुदत
ऑनलाइन नोंदणी६ ते १५ ऑगस्ट, रात्री ८ वाजेपर्यंत
नोंदणी शुल्क भरणे६ ते १५ ऑगस्ट, रात्री १० वाजेपर्यंत
कागदपत्रांची स्कॅन प्रत अपलोड६ ते १५ ऑगस्ट, रात्री ११.५९ वाजेपर्यंत
ऑनलाइन दस्तऐवज पडताळणी७ ते १७ ऑगस्ट
तात्पुरती गुणवत्ता यादी१८ ऑगस्ट
अंतिम गुणवत्ता यादी२१ ऑगस्ट
ऑनलाइन पसंतीक्रम भरणे२२ ते २४ ऑगस्ट, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत
पहिली जागावाटप यादी२५ ऑगस्ट