मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) वैद्यकीय (एमबीबीएस) व दंत (बीडीएस) अभ्यासक्रमांच्या रिक्त जागा भरण्यासाठी विशेष प्रवेश फेरी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन तीन विशेष फेऱ्या राबविण्यात येणार असून, या प्रवेश फेरींचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पहिली फेरी ८ नाेव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यातील एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन प्रवेश फेऱ्या, तसेच तीन मुक्त फेऱ्या पार पडल्या. यानंतर राज्यातील शासकीय, महानगरपालिका, शासन अनुदानित, खाजगी विना अनुदानित तसेच अल्पसंख्याक महाविद्यालयातील १३८ जागा रिक्त राहिल्या आहेत. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या खासगी महाविद्यालयात ३९, तर खासगी वैद्यकीय विद्यापीठात ४५ अशा एकूण ८४ जागा रिक्त आहेत.

तर बीडीएस अभ्यासक्रमाच्या शासकीय महाविद्यालयात २, खासगी महाविद्यालयात २२, तर खासगी वैद्यकीय विद्यापीठात ३० अशा एकूण ५४ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी वैद्यकीय समुपदेशन समितीने तीन विशेष फेऱ्या राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) नव्याने नोंदणीची संधी उपलब्ध करण्यात आली होती.

३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणीसाठी मुदत दिली होती. नोंदणीची मुदत संपल्यानंतर या जागांसाठी तीन विशेष फेऱ्या राबविण्यात येणार असल्याचे सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले असून, पहिल्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पहिली फेरी ८ नाेव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर अन्य दोन फेऱ्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

नीट यूजी-२०२६ मध्ये पात्र ठरलेले व प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केलेले व यापूर्वी कोणत्याही प्रवेश फेरीत जागा वाटप न झालेले उमेदवार या रिक्त जागाच्या प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. तसेच २६ ऑक्टोबरपर्यंत एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश घेतलेले, अखिल भारतीय कोट्यांमध्ये प्रवेश घेतलेले व मुक्त प्रवेश फेरीमध्ये जागा वाटप झालेले विद्यार्थी आणि तिन्ही नियमित प्रवेश फेऱ्या आणि मुक्त फेरीमध्ये जागा वाटप झालेले परंतु प्रवेशा न घेतलेले विद्यार्थी या फेऱ्यांसाठी अपात्र ठरणार आहेत.

पहिल्या विशेष मुक्त फेरीचे वेळापत्रक

– रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे

– ४ नोव्हेंबर – ऑनलाईन पध्दतीने पसंतीक्रम भरणे – ५ ते ७ नोव्हेंबर (दुपारी १२ पर्यंत) – ऑनलाईन विशेष मुक्त प्रवेश फेरीचा निकाल जाहीर – ८ नोव्हेंबर – महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे – १० नोव्हेंबर (सायंकाळी ५.३० पर्यंत)