मुंबई : महानगरपालिकेने ‘मुंबई स्वच्छता संकल्प ३६५’ अभियान राबविण्याचा मानस आगामी अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. या अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धेचे मूल्याकन तृतीय पक्षातर्फे करण्यात येणार असून विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत केवळ नागरिकच नव्हे तर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि नगरसेवकांनाही सहभागी होता येणार आहे.
मुंबईत स्वच्छता राखली जावी, शहर सुंदर दिसावे या उद्देशाने महापिलाकने ‘मुंबई स्वच्छता संकल्प ३६५’ या अभियानाची घोषणा आगामी अर्थसंकल्पात केली आहे. मुंबईमधील प्रत्येक गृहनिर्माण संस्था, शाळा, रुग्णालय, उद्यान, व्यापारी संकुल आदींना या अभियानात सहभागी होता येणार आहे. या अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धेचे मूल्यांकन तृतीय पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा फक्त तीन क्रमांकापुरती मर्यादित राबणार नसून सबङाग घेणाऱ्या प्रत्येक संस्थेला सन्मानीत करण्यात येणार आहे. क्यूआर कोडद्वारे नोंदणी करून प्रत्येक संस्थेला या स्पर्धेत सहभागी होता येईल. या स्पर्धेत नागरिकांसोबतच महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि नगरसेवकांनाही सहभागी होता येणार आहे. मुंबईतील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी या स्पर्धेची मोलाची मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे.
चार नवी अग्निशमन केंद्रे बांधणार
वाढती लोकसंख्या आणि मागणी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने जुहू तारा रोड – सांताक्रूझ (पश्चिम), माहुल रोड – चेंबूर आणि टिळक नगर येथे नवीन अग्निशमन केंद्रे बांधण्यात येणार आहेत. या अग्निशमन केंद्रांचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ व प्रभावी सेवा देण्यासाठी मुंबई किनारी रस्त्याजवळ (दक्षिण) एक नवे अग्निशमन केंद्र बांधण्यात येणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रकाश व्यवस्था व उच्च दाबाचे पाण्याचे पंप असलेली चार सहाय्यक वाहने, २५० मीटर उंचीपर्यंत पाणी पोहचवू शकतील अशी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली ११ प्रथम प्रतिसादात्मक अग्निशमन वाहने खरेदी करण्यात येणार आहेत.
आर्थिक विकास धोरण मुंबईच्या आर्थिक विकासाला चालना
आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच आर्थिक विकास धोरण तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रीत करणारी मोठी व लहान व्यावसायिक केंद्रे उदयास येतील. तसेच दीर्घकालीन समृद्धी वाढविणे आणि जीवनमान सुधारणे यासाठी धोरणात्मक विकास क्षेत्रे, पायाभू, सुविधांचा विकास, शाश्वत पद्धतींवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. प्रादाशिक आराखडा आणि विकास आराखडा यांच्याशी सुसंगत ठेवून मुंबईचे आर्थिक विकास धोरण तयार करण्यात येत आहे. नोंदणीकृत व्यावसायिक संस्था, सध्याची व्यवस्य स्थिती आणि प्राधान्यक्रमातील विकास क्षेत्रे यावर आधारित सर्वसमावेशक व्यावसाय आराखडा विकसित करण्यात येत आहे.
दुर्बल घटकांसाठी योजना आणि प्रकल्प
स्वयंसहाय्यता बचत गटासाठी खेळते भांडवल, आकांक्षित महिला सक्षमीकरण अर्थसहाय्य योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, रोजगाराभिमुख कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांना बस भाड्यात ५० टक्के सवलत, दिव्यांग व्यक्तींना बस भाड्यात १०० टक्के सवलत, आधार प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम / बेघरांना निवारा, विभागीय आणि क्षेत्रिय प्रदर्शन आणि िविवध कार्यक्रम, स्वसंरक्षणासाठी महिलांना प्रशिक्षण, स्वयंसहाय्यता गटाच्या लघु उद्योजकांसाठी अर्थसहाय्य, बेघरांसाठी निवारा, कौशल्य विकास, आधार केंद्रासोबत कौशल्य विकास, नोकरदार महिलांसाठी बहुउद्देशीय वसतिगृह, वयोवृद्धांसाठी निवारा, केअर सेंटर, विद्यार्थी वसतिगृह, ग्रंथालय इत्यादी. यासाठी आगामी अर्थसंकल्पात सुमारे ६० कोटी ११ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आस्थापना खर्चात वाढ
मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापना खर्चात आगामी वर्षात ६२४.५५ कोटी रुपयांनी वाढ प्रशासनाला अपेक्षित आहे. त्यामुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये आस्थापनावरील खर्च १८,१६५.१२ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे. महापालिकेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात महापालिकेचा आस्थापना खर्च १७ हजार ५४०.४७ कोटी रुपये इतका होता.

