मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) राबविण्यात येत असलेल्या मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन (एमसीए) या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करण्यास विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सीईटी कक्षाने या अभ्यासक्रमासाठी नाेंदणी करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमसीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १७ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या अभ्यासक्रमाला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता २७ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

एमसीए अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीसाठी ४ जुलैपासून सुरुवात झाली. या अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी १४ जुलैपर्यंत मुदत दिली होती. ४ ते १४ जुलै या कालावधीत या अभ्यासक्रमासाठी २८ हजार ८३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५३ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

त्यामुळे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रवेश प्रक्रियेसाठी नाेंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारच कमी आहे. विद्यार्थ्यांचा मिळालेला अल्प प्रतिसाद लक्षात घेता सीईटी कक्षाने एमसीएच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस १७ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

अंतिम गुणवत्ता यादीपर्यंतचे वेळापत्रक जाहीर

सीईटी कक्षाने एमसीए प्रवेशासाठी संकेतस्थळावर अर्जाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी १७ जुलैपर्यंत मुदतवाढ देतानाच पुढील प्रवेश परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना १७ जुलै रोजी सायंकाळी ५ पर्यंत नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत. तसेच प्रवेशासाठीच्या अर्जाची ई- पडताळणी किंवा प्रत्यक्ष छाननी व अर्ज निश्चिती १८ जुलै रोजी सायंकाळी ५ पर्यंत करता येणार आहे. २१ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या यादीवर विद्यार्थ्यांना तक्रार व आक्षेप नोंदणविण्यासाठी २२ ते २४ जुलैदरम्यान सायंकाळी ५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २७ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना ई पडताळणीचा पर्याय

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची ई-पडताळणी किंवा प्रत्यक्ष पडताळणी हे दोन पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्याने कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कोणत्याही एका पद्धतीची निवड करायची आहे. ‘ई-पडताळणी’ पर्याय निवडल्यास, अर्जाची पडताळणी ऑनलाइन पद्धतीने केली जाईल; त्यामुळे उमेदवाराला यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही. मात्र, विद्यार्थ्याने ‘प्रत्यक्ष पडताळणी’ पर्यायाची निवड केल्यास त्याला जवळच्या पडताळणी केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे.