मुंबई : मुंबईमध्ये सोमवारी आणखी एका एक वर्षांच्या मुलीचा गोवरने मृत्यू झाला. हा मृत्यू संशयित असला तरी आतापर्यंत गोवरने मृत्यू झालेल्या बालकांची संख्या १४ झाली आहे. यामध्ये मुंबईतील गोवरने मृत्यू झालेल्या बालकांची संख्या ११ असून, त्यातील तीन मृत्यू संशयित आहेत. तर मुंबईबाहेरील तीन बालकांचा गोवरने मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंधेरी येथे राहणाऱ्या एक वर्षांच्या मुलीला २६ नोव्हेंबर रोजी ताप आणि पुरळ येऊन श्वसनाचा त्रास झाल्याने महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर सर्व उपचार करूनही तिची प्रकृती खालावत जाऊन २८ नोव्हेंबरला दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या मुलीला गोवरची लस देण्यात आली नव्हती. त्यातच तिला जन्मजात हृदयविकाराचा त्रास असल्याने तिच्यावर महिनाभर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र सोमवारी तिचा गोवरने संशयित मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील गोवरने मृत्यू झालेल्या संशयित रुग्णांची संख्या तीन झाली आहे. दरम्यान, सोमवारी मुंबईमध्ये गोवरचे ११ रुग्ण आढळले असून, गोवरच्या रुग्णांची संख्या ३०३ इतकी झाली आहे. तसेच ११५ संशयित रुग्ण आढळले असून, संशयित रुग्णांची संख्या ४ हजार ६२ इतकी झाली आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये सोमवारी ७८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून ४९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. गोवरला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून नियमित तसेच अतिरिक्त लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. आतापर्यंत नियमित सत्रातून ८८११ तर अतिरिक्त लसीकरण सत्रातून १३ हजार १८ जणांचे लसीकरण झाले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Measles death toll climbs to 14th in mumbai zws
First published on: 29-11-2022 at 04:55 IST