Measles Outbreak Mumbai Metropolitan Area Ten thousand suspected patients Mumbai news ysh 95 | Loksatta

मुंबई महानगर क्षेत्रात गोवरचा उद्रेक; राज्यात दहा हजार संशयित रुग्ण

मुंबई, भिवंडीपाठोपाठ आता ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा, वसई विरार महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महापालिका या क्षेत्रातही गोवरचा उद्रेक झाला आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात गोवरचा उद्रेक; राज्यात दहा हजार संशयित रुग्ण
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबई, भिवंडीपाठोपाठ आता ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा, वसई विरार महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महापालिका या क्षेत्रातही गोवरचा उद्रेक झाला आहे. राज्यात आतापर्यंत ६५८ गोवरचे रुग्ण सापडले असून, संशयित रुग्णांची संख्या १० हजार २३४ इतकी आहे, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरांमध्ये गोवरचे ४४  रुग्ण आढळले असून ३०३ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे.

 मुंबईमध्ये गोवरच्या रुग्णसंखेत दिवसेंदिवस वाढ होत असताना आता ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातही गोवरचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत. ठाण्यामध्ये आतापर्यंत ३०३ संशयित रुग्ण, तर गोवरचे ४४ रुग्ण आढळून आले आहेत. ठाण्यातील बहुतांश रुग्ण मुंब्रा परिसरात आढळून आले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये २१० संशयित रुग्ण, तर गोवरचे १२ रुग्ण आढळून आले आहेत. नवी मुंबईमध्ये पावणे आरोग्य केंद्र परिसरामध्ये रुग्ण आढळले आहेत. ठाणे शहराप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही गोवरचा उद्रेक झाला. 

सव्वा लाख बालकांना विशेष मात्रा..

 मुंबईतील नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील ३३ आरोग्य केंद्रातील एकूण एक लाख ३४ हजार ८३३ बालकांना गोवर रूबेला लशीची विशेष मात्रा देण्यात येणार आहे. तसेच ९ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये गोवर बाधित रुग्णांचे प्रमाणे १० टक्केपेक्षा जास्त असलेल्या आरोग्य केंद्रातील एकूण ३४९६ बालकांना गोवर रूबेला लशीची विशेष मात्रा देण्यात येईल.  आंतर विभागीय समन्वयाने राज्याचा गोवर प्रतिबंधाचा निर्धार मुंबईसह राज्यामध्ये गोवरच्या रुग्णसंखेत मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याने शुक्रवारी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये गोवरचा प्रतिबंध करण्यासाठी अन्य शासकीय विभागातून मदत घेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

आरोग्यमंत्र्यांकडून आढावा..

मुंबई, भिवंडी, मालेगाव, ठाणे, वसई विरार, पनवेल आणि औरंगाबाद या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये वाढत असलेल्या गोवरच्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी गोवरबाधित महानगरपालिकांचे आयुक्त, आरोग्य अधिकारी आणि राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गोवर परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंब्रा परिसरात लसीकरणावर भर : अभिजीत बांगर

ठाणे : गोवर या आजाराचा सामना करण्यासाठी लसीकरण शिबिरे तसेच अंगणवाडयांमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबवा, अशा सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी  वैद्यकीय अधिकाऱ्यांना शनिवारी बैठकीत दिल्या.  मुंब्रा परिसरात ठिकठिकाणी लसीकरणाची मोहीम हाती घेऊन ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही, त्यांच्या कुटुंबियांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मुंबईमध्ये ३२ नवे रुग्ण: 

मुंबईमध्ये शनिवारी गोवरचे ३२ रुग्ण सापडले असून, निश्चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या २९२  झाली. तसेच ११६ संशयित रुग्ण सापडले असून संशयित रुग्णांची संख्या ३९४७ झाली. संशयित रुग्णांपैकी ४३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, २५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. गोवरमुळे शनिवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 00:53 IST
Next Story
कलापिनी कोमकली यांच्याशी आज स्वरगप्पा