मुंबई : उत्कृष्ट तपास केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाने संपूर्ण देशभरातील एकूण १५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पदके जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील ११ पोलिसांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दरवर्षी उत्कृष्ट तपासासाठी पोलिसांना पदके जाहीर करण्यात येतात. यावर्षी यात केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) १५ पोलिसांना पदके मिळाली असून त्या पाठोपाठ महाराष्ट्रातील ११, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश मधील प्रत्येकी १०, राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ पोलिसांचा समावेश आहे.  राज्य पोलीस दलातील पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर आणि अजित पाटील, पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, प्रमोद तोरडमल, दिलीप पवार, दीपशिखा वारे, सुरेशकुमार राऊत आणि  समीर अहिरराव, सहायक पोलीस निरीक्षक राणी काळे आणि मनोज मोहन पवार या ११ जणांना तपासातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पदक जाहीर झाले आहे.