विनायक डिगे, लोकसत्ता
मुंबई : महिलांमधील स्तनांच्या कर्करोगाचे निदान आणि उपचार तातडीने व्हावेत यासाठी राज्य सरकारने प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कर्करोग बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सेवेचा लाभ गावखेडय़ातील महिलांना व्हावा यासाठी प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय ५० गावे दत्तक घेणार आहे. दत्तक गावातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश त्यामागे आहे.
महिलांमधील स्तन कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार राज्यातील ४९ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विशेष कर्करोग बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. आठवडय़ातील एक दिवस या विभागात स्तन कर्करोगाची तपासणी केली जाते. या उपक्रमाची माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचावी, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाला ५० गावे दत्तक घेण्याचे किंवा सुमारे २० हजार महिलांची तपासणी करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.
वैद्यकीय महाविद्यालये शहरी भागात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या सूचनेनुसार गावे दत्तक घेऊन त्या महिलांना स्तन कर्करोगासंदर्भातील आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत, असे या उपक्रमाचे समन्वयक आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.
९,८०,००० महिलांच्या तपासणीचे लक्ष्य
राज्यातील ४९ महाविद्यालयांच्या माध्यमातून ३० ते ६४ वयोगटातील एकूण नऊ लाख ८० हजार महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीचे पहिले सत्र दोन वर्षांपर्यंत चालणार आहे. दोन वर्षांनंतर या महिलांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. तसेच दोन वर्षांनंतर या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पालवे यांनी दिली.
शिक्षण आणि जागृती
’एका शिबिरात ३० ते ६५ वयोगटातील ४० पात्र महिलांची तपासणी करण्यात येईल.
’महिलांना २० ते ३० मिनिटे आरोग्य शिक्षणाची माहिती आणि १५ ते २० मिनिटे तपासणी.
’तपासणीचा अहवाल सकारात्मक आल्यास तातडीने उपचार.
महिन्याला २१ शिबिरे : प्रत्येक महाविद्यालयाला दोन वर्षांत २० हजार महिलांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक महिन्याला २१ शिबिरे घ्यावी लागणार आहेत. या शिबिरांतून प्रत्येक महिन्याला किमान ८४० महिलांची तपासणी करण्यात येईल. वर्षभरात १० हजार ८० महिलांची, तर दोन वर्षांत २० हजार १६० महिलांची तपासणी करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.