मुंबई : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाअंतर्गत कार्यरत वैद्यकीय मूल्यांकन व दर्जा मंडळ (एमएआरबी) शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची तपासणी प्रक्रिया लवकरच सुरू करणार आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयांच्या तपासणीसाठी मूल्यांकन अधिकाऱ्यांची (अॅसेसर) समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एमएआरबीकडून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी, तसेच इतर आवश्यक तपासण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांची मूल्यांकन अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. ही तपासणी प्रक्रिया वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून काही महाविद्यालयांमध्ये अचानक तपासणी केली जाणार आहे.

या अनुषंगाने पदव्युत्तर मार्गदर्शक (पीजी गाईड) होण्यासाठी पात्र असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांची तयारी जाणून घेण्यात येत आहे. संबंधित प्राध्यापकांनी आपली तयारी दर्शविण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन एमएआरबीकडून करण्यात आले आहे. सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता व प्राचार्य यांना ही माहिती पात्र प्राध्यापकांपर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचविण्याची, तसेच सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना करण्यात आली आहे.

महाविद्यालयांच्या तपासणीसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्राध्यापकांच्या समितीवर भविष्यात वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित कागदपत्रे व अहवालांच्या मूल्यमापनासाठी तज्ज्ञ म्हणूनही जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. पात्र प्राध्यापकांनी या सूचनेच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत आपली तयारी नोंदवावी, असे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.