मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत गट ‘क’ मधील १,१०७ तांत्रिक व अतांत्रिक पदांच्या सरळ सेवा प्रवेश भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना सहायक ग्रंथपाल, ग्रंथालय सहायक आणि ग्रंथसूचीकर, प्रलेखकार या तीन पदांची निवड प्रक्रिया मात्र रखडली आहे. दुसऱ्या टप्प्यातील कागदपत्र पडताळणी जुलैमध्ये पूर्ण होऊनही पात्र व अपात्र उमेदवारांची अंतिम यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे.
आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष यांच्या अखत्यारीतील गट ‘क’ पदांसाठी १८ जून २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरतीअंतर्गत ग्रंथपाल, आहारतज्ज्ञ, समाजसेवा अधीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, औषधनिर्माता, वाहनचालक, लघुलेखक आदी विविध पदांसह एकूण १,१०७ जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली आणि १९ जानेवारी २०२६ रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर २ ते १२ फेब्रुवारी दरम्यान पहिल्या टप्प्यात कागदपत्र पडताळणी पार पडली. २५ फेब्रुवारी व २ मार्च रोजी पात्र व अपात्र उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र सहायक ग्रंथपाल, ग्रंथालय सहायक आणि ग्रंथसूचीकर, प्रलेखकार या पदांच्या याद्या तांत्रिक कारणांमुळे ५ मार्चला रद्द करण्यात आल्या.
यानंतर विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने, जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे उमेदवारच नियुक्तीस पात्र ठरले. त्यानुसार पुन्हा पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात १:१० या प्रमाणात उमेदवारांना ८, ९ आणि १० जुलैला कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात आले. मात्र पडताळणीनंतर जवळपास महिनाभर उलटूनही पात्र व अपात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झालेली नाही. परिणामी या तीन पदांची निवड प्रक्रिया रखडली आहे. दुसरीकडे, याच भरती प्रक्रियेतील इतर पदांच्या नियुक्त्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून अनेक पदांसाठी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पात्र-अपात्र यादी जाहीर करून नियुक्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू असून आठवडाभरात पात्र-अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करू – अनिल भंडारी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त
