मुंबई : उद्याचे डॉक्टर अधिक सक्षम, तंत्रज्ञानस्नेही आणि बहुआयामी असणे काळाची गरज बनली असून वैद्यकीय शिक्षणात तातडीने बदल करण्याची आवश्यकता असल्याचे ताज्या संशोधनातून समोर आले आहे. महामारी व्यवस्थापन, मानसिक आरोग्य आणि प्रिसिजन मेडिसिन (जनुकाधारित उपचार) या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर देत भविष्यातील डॉक्टरांना तयार करणे अत्यावश्यक असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी मांडला आहे.

डॉ. पथियिल रवी शंकर, डॉ. अविनाश सुपे आणि डॉ. रानो मल पिर्यानी यांनी केलेल्या या अभ्यासात बदलत्या जागतिक आरोग्य व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणातील उणिवा अधोरेखित करण्यात आल्या आहेत. ‘आर्काइव्ह्ज ऑफ मेडिसिन अँड हेल्थ सायन्सेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित लेखात त्यांनी अधिक व्यापक आणि व्यावहारिक शिक्षणपद्धतीची गरज स्पष्ट केली आहे.

आजच्या घडीला वाढती लोकसंख्या, पर्यावरणीय बदल, संसर्गजन्य रोगांचा वाढता धोका आणि तंत्रज्ञानाचा झपाट्याने होणारा वापर यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्याचबरोबर रुग्ण अधिक जागरूक झाले असून उपचार प्रक्रियेत सक्रिय सहभागाची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे केवळ वैद्यकीय ज्ञान नव्हे, तर प्रभावी संवादकौशल्य, तांत्रिक समज आणि टीमवर्कची क्षमता असणेही गरजेचे ठरत आहे.

करोना महामारीने आरोग्य व्यवस्थेतील अनेक त्रुटी उघड केल्या. या संकटाचा परिणाम केवळ आरोग्य क्षेत्रापुरता मर्यादित न राहता अर्थव्यवस्था, शिक्षण आणि सामाजिक जीवनावरही झाला. भविष्यात अशा महामारी अधिक वेगाने पसरू शकतात, असा इशारा देत संशोधकांनी वैद्यकीय अभ्यासक्रमात महामारी व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण आणि आपत्कालीन प्रतिसाद यांचा समावेश करण्याची गरज अधोरेखित केली आहे.डिजिटल तंत्रज्ञानही मानसिक आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. इंटरनेट व मोबाईल आधारित मानसिक आरोग्य सेवा विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर ठरू शकतात तर टेलीसायकियाट्रीसारख्या आधुनिक सेवांमध्ये प्रशिक्षण देणेही काळाची गरज असल्याचे अभ्यासात नमूद आहे.

याशिवाय, वैद्यकीय क्षेत्रात प्रिसिजन मेडिसिन आणि जनुकाधारित उपचारांचा वापर झपाट्याने वाढत आहे. रुग्णांच्या जनुकीय माहितीच्या आधारे वैयक्तिक उपचार देण्याची संकल्पना पुढे येत असून, डॉक्टरांनी या तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. मात्र यामध्ये गोपनीयता, नैतिकता आणि आर्थिक बाबींसारखी आव्हानेही असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणात जनुकशास्त्र, वैयक्तिक औषधोपचार आणि नैतिक निर्णय प्रक्रिया यांचा समावेश करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. काही देशांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जनुक तपासणीचा अनुभव देण्याचे प्रयोगही सुरू असल्याचे अभ्यासात नमूद आहे.संशोधनाने तीन महत्त्वाच्या शिफारसी मांडल्या आहेत. त्यानुसार, महामारीसाठी सज्जता वाढवण्यासाठी ‘वन हेल्थ’ दृष्टिकोन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणावर भर द्यावा, मानसिक आरोग्याबाबत खुला दृष्टिकोन ठेवत डिजिटल साधनांचा वापर वाढवावा आणि जनुकाधारित उपचारांबाबत सखोल शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम करावे. झपाट्याने बदलणाऱ्या आरोग्य क्षेत्राशी सुसंगत राहण्यासाठी वैद्यकीय शिक्षणात व्यापक सुधारणा करणे अपरिहार्य ठरत आहे. तांत्रिक कौशल्य, मानसिक स्थैर्य आणि बहुआयामी दृष्टिकोन असलेले डॉक्टर तयार झाले तरच भविष्यातील आरोग्य संकटांना प्रभावीपणे तोंड देता येईल, असा या अभ्यासाचा निष्कर्ष आहे.

‘वन हेल्थ’ दृष्टिकोन स्वीकारण्यावर अभ्यासात विशेष भर देण्यात आला आहे. मानव, प्राणी आणि पर्यावरण यांचा एकत्रित विचार केल्याशिवाय भविष्यातील आरोग्य संकटांना प्रभावीपणे सामोरे जाता येणार नाही असे संशोधकांचे मत आहे. कोविड काळात वैद्यकीय विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले असले, तरी पुरेशा प्रशिक्षणाअभावी त्यांना शारीरिक आणि मानसिक जोखमींचा सामना करावा लागल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.मानसिक आरोग्याचा प्रश्नही गंभीर असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये ताण, नैराश्य आणि थकवा यांचे प्रमाण जास्त असून अनेकजण करिअरवर परिणाम होईल या भीतीने मदत घेण्यास टाळाटाळ करतात. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी मजबूत आधारव्यवस्था उभी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने,विशेषतः टेलीसायकियाट्रीसारख्या पद्धतींद्वारे, मानसिक आरोग्य सेवा अधिक सुलभ करता येऊ शकतात असेही अभ्यासात नमूद केले आहे.

दरम्यान, प्रिसिजन मेडिसिन आणि जनुक तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता डॉक्टरांना या क्षेत्रातील सखोल ज्ञान असणे आवश्यक ठरत आहे. रुग्णांच्या जनुकीय माहितीच्या आधारे वैयक्तिक उपचार देणे शक्य होत असले तरी गोपनीयता, नैतिकता आणि खर्च यांसारखी आव्हानेही निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जनुकशास्त्रासोबतच नैतिक निर्णयप्रक्रिया आणि रुग्णांशी प्रभावी संवाद याचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.वैद्यकीय शिक्षण अधिक आधुनिक, सर्वसमावेशक आणि व्यावहारिक करण्याची वेळ आली आहे. महामारी व्यवस्थापन, मानसिक आरोग्य आणि जनुकाधारित उपचार या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्यास भविष्यातील आरोग्य व्यवस्थेला सक्षम आणि सज्ज डॉक्टरांचा आधार मिळू शकतो, असा निष्कर्ष डॉ. पथियिल रवी शंकर, डॉ. अविनाश सुपे आणि डॉ. रानो मल पिर्यानी यांनी मांडला आहे.