मुंबई : अग्निशमन दलाचा परवाना मिळावा याबाबत पत्रव्यवहार करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वैद्यकीय आरोग्य अधिकारी संदीप गायकवाड याच्यासह एका व्यक्तीला अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे हॉटेल असून ते त्यांनी २०१८ मध्ये खरेदी केले होते. त्यामुळे जुन्या मालकाच्या नावावर असलेला आरोग्य परवाना हस्तांतरित करणे, तसेच हॉटेलमधील डिझेल भट्टीचे एलपीजीमध्ये रूपांतरण करणे, पत्त्यामधील पिन कोडमध्ये बदल करणे आदी गोष्टींसाठी तक्रारदारांनी पालिकेच्या बी विभाग कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी गायकवाड यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारांनी त्यातील ४० हजार रुपये दिले. पण अग्निशमन दलाच्या परवान्याकरिता पत्रव्यवहार करण्यासाठी, तसेच पिन कोडमध्ये बदल करण्यासाठी गायकवाड यांनी आणखी तीन हजार रुपयांची मागणी केली. आणखी पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदारांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली. त्यानुसार एसीबीने केलेल्या तपासणीत गायकवाड यांनी सचिन कोकितकर याला तीन हजार रुपये देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचून कोकितकर याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गायकवाड व कोकितकर या दोघांना अटक केल्याची माहिती एसीबीने दिली. दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.