मुंबई : अस्थायी पद्धतीने सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना दरवर्षी एक दिवसांचा सेवा खंड दिला जातो. मात्र या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा २००९ मध्ये शासकीय सेवेत समावेश करण्यात आला. परंतु त्यांचा सेवा खंड कालावधी माफ न केल्याने त्यांना सरकारी लाभांपासून वंचित राहावे लागत होते. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सेवा खंड कालावधी माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यामध्ये विविध पदांवर कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात २००९ पूर्वी अस्थायी स्वरूपात अनेक वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा २००९ मध्ये शासकीय सेवेत समावेश करण्यात आला. मात्र सेवा खंड कालावधी माफ करण्यात आला नसल्याने त्यांना इतर लाभापासून वंचित राहावे लागत होते.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेकडून याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेत प्रकाश आबिटकर यांनी या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सेवा खंड कालावधी माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आरोग्य सेवा आयुक्तालयामध्ये गुरूवारी आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात १५० डॉक्टरांना ‘सेवा खंड कालावधी क्षमापित’ केल्याबाबतच्या पत्राचे वितरण करण्यात आले. या निर्णयामुळे शेकडो वैद्यकीय अधिकाऱ्यांची सलग सेवा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना इतर आर्थिक व प्रशासकीय लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वैद्यकीय सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सेवा खंड क्षमापित करण्याबाबतचा प्रश्न प्रदीर्घ कालावधीनंतर निकालात निघाला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेत निश्चित गुणात्मक वाढ होईल, अशी अपेक्षा प्रकाश आबिटकर यांनी केली. शासकीय आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय सेवा अधिक चांगल्या पद्धतीने द्यावी, खाजगी रुग्णालयापेक्षा सरकारी रुग्णालयांना नागरिकांनी पसंती द्यावी, अशा प्रकारची सेवा अपेक्षित आहे.
नक्षलग्रस्त आदिवासी व डोंगरी भागात कार्यरत असलेल्या वैद्यकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासह विशेष प्रोत्साहनपर भत्ता देण्यासाठी वित्त विभागास प्रस्ताव पाठवल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा फुले जन आरोग्य रोग योजनेतून उपचारासाठी मान्य असलेल्या आजारांची संख्या वाढून २ हजार ३९९ केली आहे. डॉक्टरकडे रुग्ण देव म्हणून पाहत असतात. त्यामुळे वैद्यकीय सेवेतील व्यक्तींनी समर्पित भावनेने काम करावे, असे आबिटकर म्हणाले. यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
