Mehul Choksi Canara Bank Fraud: सुमारे ५५ कोटी रुपयांच्या कॅनरा बँकेच्या कर्जाशी संबंधित फसवणूक प्रकरणात दंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या समन्सविरोधात फरारी आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने दाखल केलेला अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळून लावला.

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशात कोणतीही अयोग्यता, त्रुटी किंवा बेकायदेशीरता आढळून आलेली नाही. त्यामुळे, त्यात हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचे नमूद करून चोक्सीचा अर्ज फेटाळला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दंडाधिकारी न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली होती. त्यानंतर चोक्सी व गीतांजली समूहाचे दोन माजी कर्मचारी विपुल चिटालिया आणि अनियाथ नायर यांच्यासह या प्रकरणातील आरोपींना समन्स बजावले होते.

चोक्सी याने दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल केले होते. तसेच, दंडाधिकाऱ्यांनी कोणताही विचार न करता यांत्रिक पद्धतीने आदेश पारित केला. आरोपपत्राची तपासणी न करताच ते दाखल करण्यात आले त्या दिवशीच समन्स काढण्याचा आदेश अत्यंत वेगाने पारित करण्यात आला, असा दावाही चोक्सी याने केला होता. याव्यतिरिक्त, दंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावताना आरोपींची विशिष्ट भूमिका नमूद केलेली नाही. आदेशात त्याची कारणेही नमूद केलेली नसल्याचेही चोक्सी याने अर्जात म्हटले होते.

दुसरीकडे, कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आदेश न्याय्य आणि योग्य होता, आरोपपत्रात प्रत्येक आरोपीची विशिष्ट भूमिका नमूद केली आहे, असे सीबीआयच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, चोक्सीचा अर्ज फेटाळण्याची मागणी केली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांचा आदेश यांत्रिक, संक्षिप्त किंवा कोणताही विचार न करता दिला होता हा चोक्सी याचा दावा फेटाळून लावला. किंबहुना, संबंधित आदेशात कोणतीही अयोग्यता, त्रुटी किंवा बेकायदेशीरता नाही, असेही न्यायालयाने नमूद केलेव चोक्सीला दिलासा नाकारला.

प्रकरण काय ?

सीबीआयच्या दाव्यानुसार, कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रने बेझेल ज्वेलरीला एका कन्सोर्टियम करारानुसार अनुक्रमे ३० कोटी आणि २५ कोटी रुपयांच्या खेळत्या भांडवलाच्या सुविधा मंजूर केल्या होत्या.

हे कर्ज सोने आणि हिऱ्यांनी जडवलेल्या दागिन्यांच्या निर्मिती आणि विक्रीसाठी मंजूर करण्यात आले होते, परंतु, कंपनीने त्याचा वापर निश्चित केलेल्या उद्देशांसाठी केला नाही. कंपनीने कर्जाची परतफेडही केली नाही. परिणामी, कर्जदात्या बँकांच्या समूहाला ५५.२७ कोटी रुपयांचे नुकसान झाले. चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे १३,५०० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ”घोटाळ्या”तील मुख्य आरोपी आहेत. चोक्सी बेल्जियममधील न्यायालयात जामीनासाठी लढत आहे, तर नीरव मोदी २०१९ पासून लंडनमधील तुरुंगात आहे.