मुंबई : सध्या विदर्भात उष्णतेची लाट आहे. त्याचवेळी मेळघाटसह आसपासच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे, गावांना प्रतिगाव एक मोठ्या आकारातील पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची तातडीने सोय करणार का ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारकडे केली. तसेच त्यासंदर्भात पुढील सुनावणीला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

तापमानवाढीचा सर्वाधिक त्रास विदर्भातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. तेथील तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होऊन तेथील उन्हाळा आणखी तीव्र होणार आहे. अशावेळी मेळघाट आणि आसपासच्या गावांकडे पिण्याच्या पाण्याचा साठा नाही.

या परिसरात आतापासूनच मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. त्यामुळे या समस्येवर त्वरीत हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. अन्यथा तेथील नागरिकांचे जगणे कठीण होईल, अशा शब्दांत न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली. तसेच, मेळघाटातील पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या गावांची नावे सरकारी वकीलांकडे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना दिले.

त्याचवेळी या गावांना दररोज एक मोठ्या आकाराचा टँकर भरून पिण्याचे पाणी पुरवण्याबाबत माहिती घेऊन ती पुढील सुनावणीला सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हा पुरवठा एकापेक्षा अधिक टँकरद्वारेही असू शकतो. पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत, अशा प्रकारचा पाणीपुरवठा अविरत सुरू राहिला पाहिजे, त्यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

तर प्रधान सचिव पाण्याविना राहू शकतील का ?

संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांना सकाळी न्यायालयात येण्यास सांगावे. त्यानंतर त्यांनी सायंकाळी सहापर्यंत वातानुकूलित न्यायदालनात बसून राहावे. या काळात त्यांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही, तर चालेल का ? पाण्याशिवाय बसणे त्यांना जमेल का ? अशी विचाऱणा न्यायालयाने अतिरिक्त सरकारी वकील भूपेश सामंत यांना केली. सर्वसामान्य आदिवासी ४५ ते ४८ अंश सेल्सियसमध्ये पाण्याविना कसे राहत असतील ? पाण्यासाठी त्यांना किती पायपीट करावी लागत असेल ? याचा विचार करा, असे न्यायालयाने सुनावले. तसेच, तापमानवाढीमुळे विदर्भातील पाण्याची समस्या आणखी तीव्र होणार असल्याचे आम्ही मागील सुनावणीच्या वेली म्हटले होते याचीही न्यायालयाने आठवण करून दिली.

मेळघाटमधील अनेक गावात पाणीटंचाई

मेळघाट, चिखलदरा, धारणी आणि चुरणीसह अन्य गावांना उष्णतेचा फटका बसत असून अनेक गावात पाणीबाणीची परिस्थिती आहे. चिखलदरात एका ठिकाणी ८३ लाख रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधण्यात आली. परंतु. पिण्याच्या पाण्याची समस्या तशीच असल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्यावतीने वकील जुगलकिशोर गिल्डा यांनी केला.