मुंबई : उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भला मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा बसत आहे. येणाऱ्या काळात उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे, कुपोषणग्रस्त मेळघाट आणि आसपासच्या परिसरातील नागरिक आणि प्राण्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या. त्यादृष्टीने त्यांना पाणीपुरवठा करा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी सरकारला दिले.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मेळघाट आणि आसपासच्या परिसरात एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येऊ शकतो का ? अशी विचारणा न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी केली होती. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठापुढे गुरूवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी, याचिकाकर्त्यांनी सुचवलेल्या धारणी, चिखलदरा येथील ३३ गावांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी अनेक गावात पाणीपुरवठा नियमित सुरू असल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील भूपेश सामंत यांनी न्यायालयाला दिली. तसेच नऊ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे दर्शवणारी छायाचित्रेही त्यांनी न्यायालयात सादर केली.
याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील जुगलकिशोर गिल्डा यांनी सरकारच्या या दाव्यावर आक्षेप नोंदवला. तसेच, अद्याप अनेक दुर्गम भागात पाण्याची समस्या कायम असल्याचे न्यायालयाला सांगितले. दुसरीकडे, धारणीतील एका रुग्णालयात तातडीने पाणी उपलब्ध करण्याची मागणी शासनाकडे वारंवार करण्यात येत आहे, त्यासंदर्भात सरकारकडे अनेकदा निवेदनेही देण्यात आली आहेत. तथापि, वर्ष उलटले तरी त्याबाबत काहीच उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे या परिसरात सेवा देणारे डॉ. आशीष पालव यांच्यातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.
दाव्या-प्रतिदाव्यात नागरिकांची हेळसांड नको
सरकारच्या म्हणण्यानुसार, या भागात पाण्याची कमतरता नाही, तर याचिकाकर्त्यांच्या दाव्यानुसार अनेक गावांमध्ये पाणी नाही. अतिरिक्त सरकारी वकिलांनी सादर केलेल्या छायाचित्रांमध्ये पाणी वाहून जात असल्याचे दिसते आहे. परिणामी, दोन्ही बाजूंच्या दाव्यांत तफावत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मात्र, या सगळ्यात सर्वसामान्य आणि प्राण्यांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या, सध्या संपूर्ण विदर्भ उष्णतेच्या लाटेत होरपळून निघाला आहे. येत्या काळात तापमानाचा पारा ४८ अंश सेल्सिअस पार जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांना आणि प्राण्यांना आतापासून जून महिन्यापर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही, याची सर्वतोपरी काळजी सरकारने घ्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले.
