संगीतकार श्रीनिवास खळे, संगीतकार यशवंत देव आणि मंगेश पाडगावकर यांना मी गुरुस्थानी मानतो. मराठी भावगीत व संगीतात या तिघांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. खळे यांच्यानंतर आता पाडगावकर यांच्या निधनाने भावसंगीतातील आणखी एक दुवा तुटला आहे. मंगेश पाडगावकर हे भावगीतांमधील ‘शुक्रतारा’ होते. आज हा ‘शुक्रतारा’ निखळला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाडगावकर आजारीच होते. पंधरा दिवसांपूर्वीच माझा मुलगा अतुल याला बरोबर घेऊन मी पाडगावकरांच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो. त्या भेटीत ते खूप शांत शांत वाटले. इतके शांत मी त्यांना यापूर्वीच कधीच पाहिले नव्हते. त्यांचा स्वभाव खूप मिस्कील व खटय़ाळ होता. कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकदा आमचे एकत्र जाणे-येणे व्हायचे. संपूर्ण प्रवासात ते सतत सगळ्यांची करमणूक करत असत. त्यांचा मला खूप जवळून सहवास लाभला. कवी व लेखक म्हणून ते जबरदस्त प्रतिभेचे व ताकदीचे होतेच. पण त्याहूनही ते ‘माणूस’ म्हणून खूप मोठे होते.
पाडगावकर आणि मी वयाने तसे बरोबरीचे असलो तरी मला त्यांच्याबद्दल आदर होता. मला ते वडिलांसमान होते. त्यांच्याबरोबर कार्यक्रम करणे म्हणजे माझ्यासाठी अक्षरश: पर्वणी असायची. मीही आता वयोपरत्वे गाणे बंद केले असले तरी जोपर्यंत मराठी भावगीत व संगीत आहे तोपर्यंत पाडगावकर यांचे शब्द चिरकाळ टिकून राहतील. साधी, सोपी, ओघवती आणि मनाचा ठाव घेणारी, मनाला भावणारी शब्दरचना हे त्यांच्या कवितांचे/गाण्यांचे वैशिष्टय़ होते. म्हणूनच आज इतक्या वर्षांनंतरही त्यांची सर्वच गाणी अजरामर व रसिकांच्या ओठावर आहेत. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. अन्य कोणाही गायकाच्या वाटय़ाला आली नसतील इतकी पाडगावकरांची गाणी मला मिळाली. त्यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांपैकी बहुतांश गाणी मी गायली असून माझ्यासाठी तो आनंदाचा ठेवा आहे.
पाडगावकर यांनी लिहिलेले गाणे लोकप्रिय होणारच असे जणू काही समीकरण तयार झाले होते. त्यांनी लिहिलेले शब्द मला गायला मिळाले. जणू काही देवाने हा कवी माझ्यासाठीच पाठवला होता. ते माझे भाग्यच आहे, असे मी समजतो. पाडगावकर यांनी लिहिलेले आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले ‘शुक्रतारा मंद वारा’ हे ध्वनिमुद्रित झालेले माझे पहिले गाणे.
माझ्या या पहिल्या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी पु. ल. देशपांडे, माझे वडील रामुभय्या दाते, श्रीनिवास खळे, यशवंत देव, अनिल मोहिले अशी सर्व मंडळी उपस्थित होती. माझ्यासाठी तो एक ‘सोहळा’ होता. त्यानंतर पाडगावकर यांची अनेक गाणी मी गायली. ही सर्व गाणी अमाप लोकप्रिय झाली. त्यात पाडगावकर आणि त्या सर्व गाण्यांच्या संगीतकारांचा महत्त्वाचा वाटा आहे, हे विसरता येणार नाही. आपल्याला सगळ्यांनाच पाडगावकर यांनी ‘या जन्मावर आणि या जगण्यावर’ ‘शतदा प्रेम’ करायला शिकविले. पाडगावकर यांचे जाणे हा माझ्यासाठी फार मोठा धक्का असून आता ते आपल्यात नाहीत, यावर खरेच विश्वास बसत नाही.
(शब्दांकन- शेखर जोशी)